आपण पकडलेल्या नाग सापाची अंडी स्वतःच्या घरी आवश्यक तापमानाला उबवून जन्मलेल्या नाग सापाच्या छोट्या पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्याचे स्तुत्य कार्य सर्पमित्र रामा पाटील यांनी केल्याबद्दल त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
हलगा (बस्तवाड) येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र रामा पाटील यांनी नुकताच एक नागिन साप पकडला होता. त्यावेळी पाटील यांना त्या नागिनी सोबत तिची 20 अंडी देखील सापडली होती. शिताफिने पकडलेल्या सापाला पुन्हा जंगलात सोडून दिल्यानंतर रामा पाटील यांनी त्या सापाची अंडी नष्ट न करता त्यांना जपून स्वतःच्या घरी नेले.
तसेच ती अंडी एका विशिष्ट ट्रेमध्ये आवश्यक 30 ते 40 सेल्सिअस तापमानात उगबण्यास ठेवली. नाग सापाची ही अंडी उबवून पिले बाहेर पडण्यास तीन दिवस लागले. सापाच्या 20 अंड्यांपैकी 14 मधून पिलांचा जन्म झाला तर उर्वरित 6 अंडी खराब झाली.
सर्पमित्र रामा पाटील यांनी बेळगाव लाईव्हला आपण पकडलेला नाग साप, सापडलेली अंडी आणि सापाच्या पिलांचा जन्म याबाबत माहिती दिली. नाग सापाची छोटी छोटी पिले अंड्यातून बाहेर पडताच म्हणजे जन्मताच विषारी असतात असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे जन्मलेली सर्व 14 नागपिले आपण जंगलात नेऊन सोडणार असल्याचे सांगितले. त्यानुसार रामा पाटील यांनी ती सापाची पिले जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडली आहेत.
त्यांच्या या कृतीची आणि निस्वार्थ सर्प प्रेमाची हलगा (बस्तवाड) गावासह परिसरात प्रशंसा होत आहे