उसाचे प्रलंबित बिल तात्काळ अदा करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निजलिंगप्पा साखर संस्थेला घेराव घालून आंदोलन छेडल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी गणेशपुर येथे घडली.
शहरातील गणेशपुर रस्त्यावर निजलींगप्पा साखर संस्था आहे. या संस्थेला आज जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेराव घालून उसाची मागील वर्षाची प्रलंबित बिले तात्काळ अदा करावीत. तसेच उसाची बिले प्रलंबित ठेवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली. रामदुर्ग तालुक्यातील शिवसागर आणि कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांची उसाची बिले प्रलंबित ठेवले आहेत.
या साखर कारखान्याला ऊस घातलेल्या जिल्ह्यातील 600 हून अधिक शेतकऱ्यांची जवळपास 8 कोटी रुपयांहून अधिक उसाच्या बिलाची थकबाकी आहे. यासंदर्भात निजलिंगप्पा साखर संस्थेच्या आयुक्तांकडे तक्रार करून देखील अद्यापही त्यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी सदर संस्थेला घेराव घालून जोरदार निदर्शने केली.