पोलिओचे संपूर्ण जगातून समुळ उच्चाटन करण्याच्या ध्येयाने प्रेरित रोटरी इंटरनॅशनल संस्था लवकरच येत्या कांही वर्षात आपले हे ध्येय साध्य करेल, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठीच आपण सिंगल इंजिन विमानाद्वारे विविध देशांचा प्रवास करून जनजागृती करत आहोत, अशी माहिती अमेरिकेतील रोटरीचे माजी प्रांतपाल व इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ फ्लाईंग रोटेरियन्सचे सदस्य रो. जॉन ऑक्नेफेल्स यांनी दिली.
गुडशेड रोड येथील स्वरूप चित्रपटगृहामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी रोटरी 3170 चे माजी प्रांतपाल रो. अविनाश पोतदार, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, जॉन यांचे सहकारी रो. पीटर, रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष रो. बसवराज विभुते व रो. नरसिंह जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. रो. जॉन ऑक्नेफेल्स यांनी जगभरातून पोलिओच्या संपूर्ण निर्मूलनाचे महत्त्व आणि आपल्या जनजागृती मोहिमेविषयी माहिती दिली.
रोटरी इंटरनॅशनलतर्फे पोलिओच्या उच्चाटनासाठी जगभरात कार्य केले जाते. गेल्या 1985 पासून या कार्याला सुरुवात करण्यात आली असून तेंव्हापासून गेली 38 वर्षे पोलिओ निर्मूलनाचे हे कार्य अवरीत सुरू आहे. सध्या पाकिस्तानमध्ये एक आणि अफगाणिस्तानमध्ये दोन पोलिओचे रुग्ण आढळले आहेत. भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे 2014 पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे भारत संपूर्णपणे पोलिओ मुक्त झाला आहे. पोलिओ निर्मूलनासाठी भारतामध्ये रोटरीने केलेले कार्य प्रशंसनीय आहे.
जगभरातून पोलिओला हद्दपार करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी फाउंडेशन यांच्या सोबत बिल गेट्स संस्था, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ व राजश्री बिर्ला हे सर्वजण कार्य करत आहेत. पोलिओ निर्मूलन जनजागृतीसाठी गेल्या 5 मे पासून मी सिंगल इंजिन विमानाद्वारे विविध देशांचा प्रवास करत आहे. आमचे विमान विशेष असून त्यात कांही बदल करण्याबरोबरच खास परवाना आणि मंजुरी घेऊन या विमानाला इतर सर्वसामान्य विमानांपेक्षा अधिक मोठी इंधन टाकी बसविण्यात आली आहे. ज्यामुळे आम्ही सलग 19 तास प्रवास करू शकतो.
आजपर्यंत आम्ही 4700 मैलांचे अंतर पूर्ण केले आहे. एकंदर 25,323 मैलांचा आमचा प्रवास येत्या 31 जुलैपर्यंत म्हणजे जवळपास सलग तीन महिने चालणार आहे, अशी माहिती रो. ऑक्नेफेल्स यांनी दिली. प्रारंभी रो. अविनाश पोतदार यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पत्रकार परिषदेनंतर प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना जगभरातून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन येत्या चार-पाच वर्षात जगातून पोलिओ पूर्णपणे नाहीसा होईल, असा विश्वास व्यक्त केला.