बेळगाव शहरालगत असलेल्या कांही गावांच्या हद्दीवरून समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शहराजवळच्या 8 ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून खुद्द जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबतचे सुतोवाच केले आहे.
बेळगाव शहरालगत हिंडलगा, बेनकनहळ्ळी, मच्छे, पिरनवाडी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, काकती आणि निलजी या ग्रामपंचायतींची हद्द आहे. मात्र या हद्दीवरून समस्या निर्माण झाली आहे. कांही गावांमधील नागरिकांची नावे संबंधित ग्रामपंचायत आणि बेळगाव महापालिका अशा दोहोंच्या मतदार यादी समाविष्ट आहेत.
त्यामुळे ते दोन्हीकडे मतदान करतात. तेथील मिळकतींची घरपट्टी महापालिकेकडून वसूल केली जात असली तरी सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. बांधकाम परवानेही महापालिकाकडून दिले जात नाहीत. ग्रामपंचायत हद्दीतील कांही मिळकतींचा समावेश महापालिकेच्या प्रभागांमध्ये करण्यात आला होता. त्याला तेथील रहिवाशांनी विरोध केला होता.
या हद्दीवर आता कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कारण ग्रामपंचायतच्या हद्दीत टाकलेल्या कचऱ्याची उचल केली जात नाही. परिणामी महापालिका हद्दीत प्रवेश करताना कचरा व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याशिवाय बांधकाम परवाने, घरपट्टी वसुली वरून तर नेहमीच वाद होत असतो. त्यामुळेच संबंधित ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करून हद्द वाढ करण्याचा तत्कालिक निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा पंचायतीकडून आठ ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव कांही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. जिल्हा पंचायतीकडून तो प्रस्ताव महापालिकेकडेही पाठवण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावावर चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. तथापि आता तो प्रस्ताव चर्चेला घेण्याची सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.
जिल्हा पंचायतीने महापालिकेला पाठवलेल्या प्रस्तावात कोणत्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे हे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी शहराच्या हद्दीलगत असलेल्या आठ ग्रामपंचायतीचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच या निर्णयाला संबंधित ग्रामपंचायतीकडून विरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.