बेळगाव लाईव्ह : महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे गर्भवती, प्रसूत महिलांसह कुपोषित बालकांना तसेच इतर मुलांना अंडी वितरित करण्यात येत होती. मात्र, अंडी खरेदीला अनुदान उपलब्ध होत नसल्याची तक्रार पुढे आली असून गेल्या ४ महिन्यांपासून हि समस्या उद्द्भवत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
मुलांची तब्येत सुधारावी, आठवड्यात किमान तीन ते चार दिवस आहारात अंड्याचा समावेश व्हावा, या उद्देशाने ही योजना हाती घेतली होती. मात्र, गेल्या २ महिन्यांपासून एकीकडे अंगणवाडी कर्मचारी थकीत वेतनाच्या प्रतिक्षेत तर अनुदानाअभावी अंडी खरेदी रखडल्याने अंडी पुरवठा ठप्प झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून निवेदन देण्याची तयारी सुरु असून बंगळूरला अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे पदाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत सुमारे ६ लाख गर्भवती आणि प्रसूत महिला योजनेच्या लाभार्थी आहेत. तर ४० लाख मुलांना अंडी पुरविली जातात. गर्भवती व प्रसूत महिलांना आठवड्यातून सहा दिवस तर सामान्य मुलांसाठी आठवड्यातून दोनदा अंडी दिली जातात. सरकारी नियमानुसार जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे अंगणवाड्यांसाठी अंडी पुरवठ्यासाठी निविदा काढली जाते. मात्र, २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८० टक्के निविदा अयशस्वी ठरल्या. बालविकास समितीकडून योजनेसाठी अनुदान मिळाले नाही. राज्यात मार्च अखेरला विधानसभेची निवडणूक घोषित झाल्याने अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. याशिवाय काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अंडी पुरवठा रखडला आहे. यासंदर्भात महिला आणि बाल कल्याण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत असून तांत्रिक अडचणी त्वरित दूर केल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे.