बेळगाव लाईव्ह : मद्यप्राशन करून शाळेचे पावित्र्य बिघडविणाऱ्या मद्यपी शिक्षकाला शाळा सुधारणा कमिटी सदस्य आणि पालकांनी चांगलाच धडा शिकविला आहे. मद्यपी शिक्षकाने शाळेत मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या शिक्षकाचा पालक आणि एसडीएमसी सदस्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
बेळगाव तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत कार्यरत असणारा मद्यपी शिक्षक पी. व्ही. पाटील दररोज मद्यपान करून शाळेत वावरायचा. सदर शिक्षकाचे वर्तनदेखील योग्य नव्हते. या शिक्षकाविरोधात अनेक तक्रारी देखील येत होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकाच्या नेहमीच्या वर्तनाबद्दल सविस्तर माहिती दिली.
शिकवण्याच्या वेळी शिक्षक झोपी जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान या शिक्षकाला एसडीएमसी सदस्य आणि पालकांनी रंगेहात पकडून वाहनाची चावी काढून घेत कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावेळी शिक्षकाने गयावया करण्यास सुरुवात केली. मात्र एसडीएमसी सदस्य आणि पालकांनी शिक्षकाच्या या वर्तनाला गांभीर्याने घेत वरिष्ठांकडे पुराव्यानिशी तक्रार करण्याची भूमिका घेतली. शाळेतून निलंबन केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा पवित्र घेतला.
पालक आणि एसडीएमसी सदस्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर शिक्षकाने शाळेतून काढता पाय घेतला. यावेळी त्या शिक्षकाला आपला भार सांभाळून चालणेही कठीण होत असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणाऱ्या शिक्षकाकडूनच असे लांच्छनास्पद कृत्य झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणते परिणाम होणार असा प्रश्न पालकातून व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील पुढे येत आहे.