बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज वडगाव आणि येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
रिंगरोड तसेच हलगा-मच्छे बायपास प्रकल्प रद्द करून बेळगावातील लोकांच्या सुपीक शेतजमिनी वाचविण्यात याव्यात, बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, वडगाव, जुने बेळगाव आणि शहापूर परिसरातील पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करावी, प्रलंबित असलेली स्मार्ट सिटीची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराची आणि कामाच्या दर्जाचीही चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महापालिकेत बैठक घेतली या विकास आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस पडला शेकडो लोकांनी विविध समस्या मांडल्या.
स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी; पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट; स्मशानभूमी विकास, भटक्या कुत्र्यांची पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आहे. याबाबत सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या.
या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी आपापल्या भागातील समस्यांचा पाढा मंत्री जारकीहोळी यांच्यासमोर मांडला. बहुसंख्य नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास कामत आपल्या परिसरावर अन्याय झाल्याची खंत ही अनेकांनी बोलावून दाखवली.
यावेळी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याची जबाबदारी आपली आहे. नागरिकांनी विविध विभागा अंतर्गत येणाऱ्या समस्या मांडल्या आहेत. स्मार्ट सिटी, हेस्कॉमसह महत्त्वाच्या विभागांची स्वतंत्र बैठक घेतली जाईल. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला जाईल. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक चांगले काम केले पाहिजे. महापालिका सदस्यांनी नमूद केलेली कामे प्राधान्याने करावीत, असे ते म्हणाले.