अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्याने 108 रुग्णवाहिकेतून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत असताना एक महिला रुग्णवाहिकेतच सुखरूप प्रसुत होऊन तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना नुकतीच बेकीनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे घडली.
बेकीनकेरे येथील एका गरोदर महिलेला काल शुक्रवारी पहाटे प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला.
तेंव्हा रुग्णवाहिका चालक इराण्णा ज्योती व नर्सिंग स्टाफ जी. रमेश तातडीने रुग्णवाहिका घेऊन बेकीनकेरे येथे दाखल झाले आणि त्या महिलेला घेऊन बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलकडे मार्गस्थ झाले.
तथापी वाटेतच प्रसूती वेदना प्रचंड वाढल्याने रुग्णवाहिकेतच त्या महिलेची प्रसूती करावी लागली आणि तिने पुत्ररत्नाला जन्म दिला. त्यानंतर बाळंतीण महिला आणि तिच्या नवजात शिशुला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सध्या माता आणि बालक या दोघांची प्रकृती उत्तम आहे. 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नारू निलजकर, अवधूत तुडवेकर, संतोष दरेकर आतिश धाटोंबे आदी उपस्थित होते.