बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याद्वारे भारतीय हवाई दलात देश सेवेसाठी रुजू होण्यास सज्ज असलेल्या 2,675 इतक्या अग्नीवीर जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला.
सांबरा हवाई दल परेड मैदानावर आज आयोजित या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअरमार्शल आर. राधीश उपस्थित होते.
प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीवीरांनी वाद्य वृंदाच्या तालावर शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर प्रमुख पाहुणे एअरमार्शल राधीश यांनी परेडची पाहणी केली. त्यानंतर सर्व अग्नीवीरांना कर्तव्याची आणि देश संरक्षणाची शपथ देवविण्यात आली. याप्रसंगी बोलताना एअरमार्शल आर. राधीश यांनी भारतीय हवाई दलात 3000 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी देशभरातून सात लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत असे सांगून बेळगावात प्रशिक्षण घेतलेल्या या सर्व अग्नीवीरांना आता देशसेवेचा सन्मान मिळणार आहे, असे सांगितले.
सदर दीक्षांत सोहळ्यास हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीविरांच्या कुटुंबीयांसह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे गेल्या 30 डिसेंबर 2022 रोजी अग्निविरांच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला होता.
आता स्त्री पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी भारतीय हवाई दलाने महिला उमेदवारांसाठी देखील आपली द्वारे खुली केली आहेत. या महिला उमेदवारांच्या प्रशिक्षणाला येत्या 28 जून 2023 पासून सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे प्रारंभ होणार असल्याची माहिती आजच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी देण्यात आली.