प्रत्येक वेळी अधिकारीवर्ग वेळ काढूपणा करत असल्यामुळे नगरसेवकाच्या विनंतीने प्रभागातील लहानसहान विकास कामे त्वरित केली जावीत, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध तक्रारी वजा मागण्यांचे निवेदन प्रभाग क्र. 5 च्या नगरसेविका अफ्रोज शकील मुल्ला यांनी आज महापौरांना सादर केले.
शहरातील प्रभाग क्र. 5 च्या नगरसेविका अफ्रोज शकील मुल्ला यांनी आज शुक्रवारी सकाळी महापालिका कार्यालयात महापौर शोभा सोमनाचे यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी त्यांनी आपल्या प्रभागातील समस्यांची माहिती महापौरांना दिली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून महापौरांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
अधिकाऱ्यांच्या वेळ काढूपणामुळे प्रत्येक वेळी प्रभागातील विकास कामे लवकर होत नाहीत. त्यासाठी जी लहानसहान विकास कामे आहेत ती नगरसेवकांच्या विनंतीनुसार तात्काळ सुरू केली जावीत. प्रभागातील कोणतेही काम कंत्राटदाराकडे सोपवताना कमी रकमेची निविदा निवडली गेली पाहिजे. मात्र तसे न होता प्रत्येक अधिकारी आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कामाचे कंत्राट देतात. याकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे.
सध्या महापालिकेच्या कारभारामध्ये जे एजंट राज चालले आहे त्याला आळा घालणे गरजेचे आहे. या एजंटगिरीमुळे नागरिकांची लूट होत आहे. माझ्या प्रभागातील सफाई कामगारांच्या पॅकेजमध्ये सावळा गोंधळ असतो.
यासाठी प्रभाग क्र. 5 मध्ये कायमस्वरूपी सफाई कामगार नेमावेत. ड्रेनेची साफसफाई करणारे कामगार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत काम करतात. त्यांना पुन्हा एरिया हेल्थ इन्स्पेक्टरच्या हाताखालील चमूमध्ये समाविष्ट केले जावे. या खेरीज सध्या जन्मदाखला दुरुस्तीसाठी नागरिकांना कोर्ट ऑर्डर आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब लोकांना त्रास होत आहे.
तेंव्हा जन्मदाखला दुरुस्तीसाठी ॲफीडेव्हीट, आधार कार्ड, स्कूल सर्टिफिकेट याच्या आधारे दुरुस्ती करून दिली जावी. माझ्या प्रभागात मुळातच कमी सफाई कामगार आहेत ते आणि जे अधिकारी आहेत ते नागरिकांसह माझा मान राखत नाहीत. तेंव्हा त्यांची त्वरित अन्यत्र बदली करावी, अशा आशयाचा तपशील नगरसेविका अफ्रोज मुल्ला यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.