सरकारने अचानक 30 ते 65 टक्केपर्यंत अवास्तव वीज दरवाढ केली आहे. ही अन्यायी दरवाढ करून लोकांना त्रासात टाकण्याची काम सरकारने केले असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आणि व्यापारी संघटनांसह चेंबर ऑफ कॉमर्स हॉस्पिटल्स तसेच इतर संघटनांतर्फे संयुक्तरीत्या उद्या मंगळवार दि 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून सरकारला निवेदन सादर केले जाणार आहे.
नुकतीच झालेली विजेची दरवाढ आणि राज्यभरात कार्यरत इस्कॉमकडून आकारले जाणारे अयोग्य असामान्य शुल्क याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांच्या फोरमतर्फे शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती देण्यात आली. राज्यातील अवास्तव वीज दरवाढीचा प्रतिकूल परिणाम संपूर्ण समाजासह औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रावर झाला आहे.
अचानक लादलेल्या या वीज दरवाढीच्या बोजाच्या निषेधार्थ आवाज उठवणे गरजेचे आहे. आधीच वीज दरवाढीला तोंड देताना सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग आणि व्यापार क्षेत्र मेटाकुटीस आले असून त्यांना एफपीपीसीएच्या सध्याच्या अवास्तव दरवाढीशी सामना करणे कठीण जात आहे. तेव्हा सरकारने हस्तक्षेप करून अवास्तव वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यास लावून ही समस्या आठवड्याभरात मिटवावी.
अन्यथा या दरवाढीच्या विरोधात आम्हाला नाईलाजाने राज्यव्यापी आंदोलन छेडावे लागेल हा आमचा सरकारला इशारा आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनांनी पुढील प्रमाणे कृती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
1) उद्या मंगळवार दि 13 जून रोजी सकाळी 10:15 वाजता मूक मोर्चाद्वारे बेळगाव जिल्हाधिकारी, हेस्कॉम, संबंधित मंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील आमदारांना निवेदन सादर केले जाईल. चन्नम्मा सर्कल येथून सुरू होणाऱ्या या मोर्चात बेळगाव जिल्ह्यातील सर्व संघटना आणि हेस्कॉमचे ग्राहक सहभागी होऊन मूकनिषेध नोंदवतील. 2) वीज दरवाढ मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांना आठवड्याभराची मुदत दिली जाईल. 3) अधिकाऱ्यांनी जर कोणतीच कार्यवाही केली नाही तर निषेधाचे कठोर उपाय अवलंबले जातील ज्यामध्ये वेळप्रसंगी राज्यभरातील सर्व औद्योगिक क्षेत्र आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे अस्त्रही वापरले जाईल.
4) त्याचप्रमाणे अन्याय वीज दर वाढीच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले जातील. तेंव्हा सरकारने कृपया याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून दरवाढ मागे घेण्याद्वारे राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकारी सदस्यांसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक आणि व्यापारी तसेच अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.