बेळगाव महानगरपालिकेकडून शहरात रहदारीला अडथळा ठरणार्या मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी ही मोहीम सुरूच होती.
महापालिकेच्या पथकाने आज गुरुवारी खडेबाजार येथून तीन मोकाट जनावरे पडकली. शहरात वाहतुकीला अडथळा ठरणार्या मोकाट जनावरांना पकडण्याबाबत आदेश मिळाला असल्यामुळे महापालिकेच्या पथकाने काल सकाळी नरगुंदकर भावे चौकातील मोकाट जनावरे पकडली होती. त्या जनावरांना के.के. कोप्प गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे पशु संगोपन खात्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या सहकार्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
सध्या श्रीनगर येथील गोशाळेत पकडलेल्या जनावरांची रवानगी केली जात नाही. कारण जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशु संगोपन खात्याचे डॉक्टर श्रीनगर येथील गोशाळेत येत नाहीत.
केके कोप येथील गोशाळेत मात्र डॉक्टर तैनात असल्यामुळे पकडलेली मोकाट जनावरे तेथील गोशाळेत ठेवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या पशु संगोपन विभागाकडून देण्यात आली.