बेळगाव लाईव्ह : राकसकोप जलाशयाच्या डेड स्टॉक मध्ये केवळ तीन फूट पाणी साठा शिल्लक असून पाणी साठा वाढण्यासाठी प्रशासन पावसावर अवलंबून आहे, यामुळे बेळगावकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन बेगाव महानगरपालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी केले आहे. आज महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह महानगर पालिका, पाणीपुरवठा मंडळ आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलाशयात किती आणि किती दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
केयूआयडीएफसीचे अधीक्षक, अभियंता अशोक बुरकुले यांनी राकसकोप जलाशयाच्या सध्यस्थितीविषयी माहिती देताना सांगितले कि, जलाशयाची पाणीपुरवठा क्षमता ६८ एमएलडी आहे. येथून बेळगाव शहराला दररोज ५५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र सध्या पाण्याची पातळी कमी असल्याने केवळ ३० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पावसाअभावी ही परिस्थिती ओढवली आहे. आठवडाभरात मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत बेळगावातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, सहाय्यक कार्यकारी अभियंता शशीकुमार हत्ती, सहाय्यक अभियंता उमेश निट्टूरकर, केयूडब्ल्यूएसडीबी असिस्टंट आर्किटेक्ट मंजुनाथ, स्मार्ट सिटी टीम लीडर रामचंद्रय्या, एम रविकुमार, नगर परिषदेचे पर्यावरण अभियंता कलादगी, प्रवीणा आदी उपस्थित होते.