बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या शक्ती योजने अंतर्गत महिलांना मोफत बसप्रवास करण्याची मुभा पुरविली आहे. मोफत बससेवेमुळे बहुसंख्य महिला बसमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत असून रिक्षा सेवेकडे मात्र महिलांनी पाठ फिरविली आहे. परिणामी रिक्षा चालकांच्या व्यवसायाला फटका बसत आहे.
काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या शक्ती योजनेच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान बेळगावमधील रिक्षा संघटना रस्त्यावर उतरल्या.
शक्ती योजनेमुळे रिक्षातून प्रवास करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविली असून यामुळे रिक्षाचालकांना फटका बसत आहे. हि योजना मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज रिक्षा चालकांनी संप पुकारत सरकारचा निषेध केला.
मध्यवर्ती बस स्थानकासमोर निदर्शने करत रिक्षा चालकांनी ट्राफिक जाम केला. यावेळी रहदारी विभागाच्या पोलीस निरीक्षकांनी हस्तक्षेप करून संप मागे घेण्याची विनंती केली आणि वाहतूक पूर्ववत केली.
यावेळी संतप्त रिक्षाचालकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सदर योजना मागे घेण्याची विनंती केली. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील रणनीती आखली जाईल, असेही रिक्षा चालकांनी यावेळी सांगितले.