ॲपल फोन बनवणाऱ्या फॉक्सकॉनला या स्पेअर पार्ट्स बनवणारी आणि पुरवठा करणारी SFS कंपनीने बेळगावात 250 कोटी रु. गुंतवणुकीसाठी पुढे येत असून त्यांनी युनिट स्थापित करण्यासाठी 30 एकर जमीन मागितली आहे. हा स्वागतार्ह प्रस्ताव असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ, मोठे व मध्यम उद्योग मंत्री एम.बी.पाटीला यांनी सांगितले आहे.
एसएफएस कंपनीचे सीएमओ फारस शॉ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी बुधवारी बंगळूर येथे अवजड उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेतली.
कंपनीच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करत असून याबाबत कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एसएफएस कंपनी होनगा येथे एअरोस्पेस उद्योगासाठी सुटे भाग तयार करते.
SFS ही कंपनी आधीच बेळगावमध्ये एरोस्पेस उद्योगासाठी सुटे भाग तयार करत आहे. आता राज्यात ॲपल फोन अॅक्सेसरीजसाठी उत्पादन युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून येत्या तीन वर्षांत 500 तंत्रज्ञांना रोजगार मिळणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय अप्रत्यक्षरीत्या शेकडो नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव हे राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. तेथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तो मुंबई-बेंगळुरू-चेन्नई कॉरिडॉरवर पडत असल्याने औद्योगिक वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. त्याचा प्रभावीपणे वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी एसएफएस कंपनीचे संचालक प्रशांत कोरे, उद्योग विभागाचे आयुक्त गुंजन कृष्णा उपस्थित होते.