Sunday, January 5, 2025

/

अष्टपैलू आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व : कॉ. नागेश सातेरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नगरसेवक, महापौर ,वकील कामगार नेते म्हणून नावाजलेले बहुआयामी, अष्टपैलू आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून बेळगावच्या ऍड. नागेश सातेरी यांचे नाव घेतले जाते. येत्या रविवारी 18 रोजी अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा ‘बेळगाव लाईव्ह’ ने घेतलेला आढावा..

बेळगावचे राजकारण, महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, शेकडो कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना पाठबळ देणे, गरीब जनतेसाठी वकिली पेशा सांभाळणे, कामगारांचे प्रश्न सोडविणे आणि सीमाप्रश्नाविषयी बांधिलकी जपत कारागृहाची शिक्षा भोगून आज वयाच्या ७५ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवेल असा उत्साह आणि कामाचा जोम असलेले कॉ. नागेश सातेरी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत.

आजवर त्यांनी विविध संघ-संस्था-संघटनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. बेळगाव महानगरपालिकेत १९८४ साली नगरसेवक पद भूषविले. १९८७ साली महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळविला. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामगारांच्या उपजीविकेसाठी आंदोलने केली. या आंदोलनापैकीच एक आंदोलन म्हणजे तत्कालीन मनपा आयुक्त शेट्टी यांच्या कार्यकाळात झालेले ३५० कामगारांसंदर्भातील आंदोलन. कामगारांची संख्या अधिक असल्याने कामावरून कमी करण्याचा प्रस्ताव आयुक्त शेट्टी यांच्या कार्यकाळात मांडण्यात आला. आणि ५० विरोधी १ अशा मताने तो पासही झाला. यावेळी कामगारांच्या बाजूने भक्कमपणे उभं राहात कॉ. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली ऐन गणेशोत्सवाच्या काळात कामगारांचा संप पुकारण्यात आला. काही कामगारांना अटकही झाली. या संपाची परिसीमा इतकी मोठी होती कि बहुमत असूनदेखील प्रस्ताव मागे घेण्याची वेळ मनपा आयुक्तांवर आली. कॉ. कृष्णा मेणसे आणि शिवाजीराव काकतकर यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली. आणि अखेर सर्व ५१ नगरसेवकांनी कामगारांना कमी करण्याचा ठराव मागे घेतला. Nagesh sateri

कॉ. नागेश सातेरी यांच्याच कार्यकाळात महापौर कुस्त्यांची सुरुवात करण्यात आली. जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या कुस्त्यांना नागेश सातेरी यांनी पुनरुज्जीवन दिले. पहिल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या नागेश सातेरी यांचा संभाजी उद्यानात भव्य सत्कार करण्यात आला. आजतागायत त्यांनी विविध कामगार संघटनांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. अनेक कामगारांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. बेळगाव जिल्ह्यात असलेल्या एकूण ३५३७ अंगणवाड्यांपैकी जवळपास २००० अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना नागेश सातेरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आशा वर्कर्सचे प्रलंबित प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात देखील नागेश सातेरी यांचा मोठा वाटा आहे. केएसआरटीसी कामगार संघटना, पुरोगामी चळवळ, साप्ताहिक साम्यवादीचे पत्रकार, नामांकित वकील, ४९ वर्षांपासून गरिबांसाठी आपल्या वकिली पेशाचा वापर अशा अनेक क्षेत्रात त्यांचे नाव नावाजलेले आहे.

न्यायप्रविष्ट असणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय सहभाग आजतागायत नोंदविला आहे. १९८६ साली झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनात त्यांना अटक देखील झाली होती. यादरम्यान त्यांनी २२ दिवस कारावास देखील भोगला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींमध्ये आजवर त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सन १९६९ सालापासून डाव्या चळवळीत सक्रीय झालेले कॉ. सातेरी पुढे देखील वेगळ्या पद्धतीने चळवळीत सक्रीय राहतील यात शंका नाही. त्यांना पुढील आयुष्यात चांगले आरोग्य लाभो व त्यांच्या हातून समाज परिवर्तनाचे कार्य घडो हीच सदिच्छा!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.