बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव ग्रामीणच्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि निपाणीच्या शशिकला जोल्ले यांच्यासह राज्यातील एकूण 11 महिला यावेळी कर्नाटक विधानसभेतील 224 जागांपैकी अकरा जागांचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहेत.
या वेळच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 11 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर 5 महिला निवडून आल्या असून भाजपमधील 3, निजदच्या 2 तर एका अपक्ष महिला उमेदवारांचा समावेश आहे.
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. महिला उमेदवारांमध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्यांनी विजय होण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे. निपाणी मतदारसंघातून भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांनी विजय संपादन करत तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक साधली आहे.
देवदुर्ग मतदार संघात निधर्मी जनता दलाच्या उमेदवार करेम्मा विजयी झाल्या आहेत. गुलबर्गा उत्तर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार कनिजा फातिमा दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत. हरप्पनहळ्ळी मतदारसंघात माजी मंत्री जी. करुणाकर रेड्डी यांना पराभूत करत अपक्ष महिला उमेदवार लता मल्लिकार्जुन यांनी विजय संपादन केला आहे. जयनगर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत.
कोल्हार गोल्डफिल्ड मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार रूपकला एम. दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत. महादेवपुरा मतदार संघातून माजी आमदार अरविंद लिंबावळी यांच्या पत्नी मंजुळा या विजयी झाल्या आहेत. शिमोगा ग्रामीण मतदारसंघात निधर्मी जनता दलाच्या शारदा नाईक यांनी विजय संपादन केला आहे. सुळ्य मतदारसंघात यावेळी भाजपने नवा चेहरा म्हणून भागीरथी मुरूळ्य यांना महिला उमेदवार म्हणून संधी दिली होती.
त्या देखील विजयी झाल्या आहेत. याखेरीज मुडेगेरे मतदारसंघात काँग्रेस उमेदवार नयना मोटाम्मा यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. या पद्धतीने बेळगाव जिल्ह्यातील दोघींसह एकूण 11 रणरागिणी यावेळी कर्नाटक विधानसभेत निवडून गेल्या आहेत.