बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात जागृती केली आहे.
मतदानासाठी जागृती करण्यासाठी सायकल फेरी, पथनाट्य, प्रचारफेरी, व्हिडिओ यासारखे उपक्रम प्रशासनाने राबविले असून या निवडणुकीत विशेष थीम असणारी मतदान केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. विशेष थीमनुसार स्थापन करण्यात आलेली मतदार केंद्रे लक्षवेधी ठरत असून प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांसाठी सखी किंवा पिंक बूथ सुरू करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांमध्ये मतदानप्रक्रियेचे चित्रिकरण, वेब कास्टिंग देखील करण्यात येणार असून एकंदरीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे.
मतदारांसाठी विश्रांती खोली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडेच नोंदणी केलेल्या ८० वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी बॅलेट पेपरद्वारे घरबसल्या मतदान घेण्यात आले आहे.
मतदानाला जाण्यापूर्वी खालील कागदपत्रे आपल्यासोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी मतदान नाकारले जावू नये या हेतूने निवडणूक आयोगाने कोणती ओळखपत्रे चालतील याची यादी दिली आहे.
त्यानुसार १. आधारकार्ड, २. मनरेगा जॉब कार्ड, ३. पासबुक (ज्यावर बँक किंवा पोस्ट खात्याने मान्य केलेले छायाचित्र हवे), ४. आरोग्य विमा कार्ड (हेल्थ इन्शुरन्स कार्ड – ज्याला कामगार खात्याने मान्यता दिली आहे.),
५. वाहन परवाना, ६. पॅनकार्ड, ७. आरजीआयने मंजूर केलेले स्मार्टकार्ड, ८. भारतीय पासपोर्ट, ९. केंद्र, राज्य सरकार, पब्लीक लि. कंपन्या यांनी दिलेले कर्मचारी ओळखपत्र, १०. दिव्यांग कार्ड.