एकीकडे संपूर्ण देश रद्द होणाऱ्या 2000 रुपयांच्या नोटांमुळे त्रासात असताना दुसरीकडे अजूनही आपले बेळगाववासीय आम्ही 10 रुपयांची नाणी स्वीकारत नाही अशी फुशारकी मारण्यात धन्यता मानत आहेत.
कारण आपल्या शहरात रस्त्यावरील भाजीविक्रेते बंद होणारी 2000 रुपयांची नोट एकवेळ घ्यावयास तयार होतील, मात्र 10 रुपयाचे नाणे कदापी स्वीकारणार नाहीत. हे विचित्र वाटत असले तरी सध्याचे वास्तव आहे.
दहा रुपयाचे नाणे चालणार नाही, नोट द्या हे विक्रेत्यांचे आणि व्यापाऱ्यांचे उत्तर ऐकून सध्या बेळगाव येथील नागरिक हैराण झाले आहेत.
इतरत्र 10 रुपयांचे नाणे आजही चलनात ग्राह्य मानले जात असताना बेळगावमध्ये मात्र हे नाणे का चालत नाही? याचे कोडे सर्वांना पडले आहे. वास्तविक 10 रुपयाच्या नाण्यांवर कोणतीही बंदी नसताना बेळगावमध्ये हे नाणे चालणार नाही असे सांगितले जाते आणि ते का चालत नाही? याचे उत्तरही कोणाकडे नाही.
कोणत्याही प्रामुख्याने भाजी विक्रेत्यांना 10 रुपयांचे नाणे दिले की हे नाणे बेळगावमध्ये चालणार नाही असे सांगण्यात येते. मात्र त्याचे कारण विक्रेते देऊ शकत नाहीत. या प्रकारामुळे महाराष्ट्र व गोव्यातून बेळगावमध्ये खरेदीसाठी अनेक ग्राहक येत आहेत त्यांना बाजारपेठेत काहीही खरेदी करताना 10 रुपयांच्या नाण्याबाबत अडचण येत आहे.
कांही महिन्यांपूर्वी बेळगाव प्रशासनाने आणि तत्पूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने 10 रुपयांचे नाणे व्यवहारातून रद्दबातल झालेले नाही आणि ते चालूच शकते असे स्पष्ट करूनही शहरात अद्यापही 10 रुपयाच्या नाण्याबाबत उदासीनता आहे. खुद्द राज्याची राजधानी बेंगलोरमध्ये 10 रुपयाची नाणी सर्रासपणे चलनात आहेत.
तथापि आजही बेळगाव शहरातील अनेक व्यावसायिक आस्थापने, लहान व्यापारी आणि खाजगी प्रवासी सेवा देणारे असे सर्वजण 10 रुपयाचे नाणे स्वीकारण्यास तयार होत नाहीत. प्रशासनाच्या आदेश वजा स्पष्टीकरणाच्या वृत्तपत्रांनी छापलेल्या बातम्यांची कात्रणे शहरातील बऱ्याचशा व्यापारी, विक्रेते आणि हॉटेल चालकांनी आपल्या काउंटरच्या दर्शनीय भागात लावून ठेवली आहेत. मात्र दुर्दैवाने तरी देखील 10 रुपयाचे नाणे स्वीकारण्यास कोणी तयार होत नाही. याला आणखीन एक कारण म्हणजे 10 रुपयांची बनावट बोगस नाणी चलनात आली असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे.
दरम्यान यासंदर्भात प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 10 रुपयाचे नाणे रद्दबातल झाले नाही. लवकरच आपण तसा आदेश जारी करू आणि प्रसिद्धीस देऊ असे स्पष्ट केल्याचे कळते.