बेळगाव लाईव्ह : नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगाव महानगर पालिका हद्दीतील कचरा उचलीची समस्या सोडविण्यासाठी तातडीने फेरनिविदा मागविण्यात यावी, या मागणीसाठी प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
अलीकडेच बीव्हीजी या कंपनीला सफाईचे कंत्राट देण्यात आले आहे. बीव्हीजी कंपनीला कंत्राट देऊनदेखील आठ महिने उलटले आहेत. आठ महिने उलटून देखील या कंपनीकडून कचरा उचल करण्यात आली नसून याबाबत मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. सदर कंत्राटदार नवखा असल्याने कंत्राटदाराला थोडा वेळ देण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली. यानुसार सदर कंत्राटदाराला १ महिन्याची मुदत देण्यात आली.
यानंतर देखील तीनवेळा नोटीस पाठवूनही अद्याप कंत्राटदाराने कामाची सुरुवात केली नाही. ६ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणुकीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ते, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या मालकीच्या वाहनातून घिसाडघाईने कामाची सुरुवात करण्यात आली.
मात्र त्यानंतर कामाची सुरुवातच झाली नसल्याचे निदर्शनात आले आहे. टेंडर पास होऊनदेखील आठ महिन्यांचा अवधी उलटला असून या कमला विलंब कुणाच्या सांगण्यावरून होत आहे? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी सफाई कंत्राट देण्यासाठी तातडीने फेरनिविदा मागवण्याची विनंती प्रादेशिक आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.