बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या आंधळ्या कारभारामुळे समस्त जनता वैतागून गेली आहे. स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभाराचा नमुना आज पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवायला मिळाला जेंव्हा एका कार गाडीची चाके रस्ता आणि दुभाजक यांच्यामध्ये असलेल्या चरित अडकून पडली.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवडलेल्या देशातील शहरांपैकी बेळगाव हे बहुदा एकमेव शहर असे असावे की ज्या ठिकाणी 5 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी स्मार्ट सिटीची कामे अद्यापही सुरूच आहेत. कांही ठराविक रस्ते परिसर वगळता तर अन्य परिसर पाहून आज परगावच्या लोकांना बेळगाव स्मार्ट सिटी झाल्याचे जाणवत नाही ही बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अकार्यक्षमतेची पावती आहे असे म्हणावे लागेल.
स्मार्ट सिटीची कांही मोजकी कामे वगळली तर जवळपास सर्व विकास कामे पूर्ण झाली आहेत असे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ती देखील व्यवस्थित पूर्ण करण्यात आलेली नाहीत. ज्याचा त्रास सर्वसामान्य शहरवासीयांना रोजच्या रोज सहन करावा लागत आहे.
सध्या याचे जिवंत उदाहरण म्हणजे टिळकवाडीतील आरपीडी कॉर्नर पासून ते गोवावेस पर्यंतचा खानापूर रोड हा रस्ता होय. सदर अलीकडच्या काळात रुंदीकरण करून व्यवस्थित डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता अपवाद वगळता संपूर्णपणे व्यवस्थित असताना आता त्याचे कॉंक्रिटीकरण केले जात आहे. खरे तर मूळ डांबरी रस्ता चांगला मजबूत सुस्थितीत असताना त्याचे पुन्हा कॉंक्रिटीकरण का केले जात आहे? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.
रस्ता अधिक चांगला होणार असेल त्यासाठी कॉंक्रिटीकरण केले जात असेल तर चांगलेच आहे. मात्र ते कॉंक्रिटीकरण तरी व्यवस्थित केले जावे अशी जनतेची माफक अपेक्षा आहे. खानापूर रोडचे कॉंक्रिटीकरण अत्यंत घिसाड घाईत बेजबाबदारपणे केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या रस्त्यावरील दुभाजकाला लागून करण्याऐवजी काही अंतर सोडून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या अर्धवट काँक्रिटीकरणामुळे रस्ता आणि दुभाजका शेजारी लांबच्या लांब गटार सदृश्य चर निर्माण झाली आहे. या चरीचा अंदाज न आल्यामुळे आज शनिवारी एका कार चालकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
आरपीडी कॉर्नरकडून गोवावेसकडे निघालेल्या या वाहन चालकाच्या कार गाडीची चाके अनावधानाने दुभाजका शेजारील गटार सदृश्य चरीमध्ये गेली आणि गाडी नियंत्रणाखाली आणणे त्याला कठीण झाले. कारगाडी चरीत अडकून पडल्याचे पाहून आसपासचे लोक त्याच्या मदतीला धावले आणि सर्वांनी मतप्रयासाने ती गाडी उचलून पुनश्च रस्त्यावर ठेवली. या पद्धतीने स्मार्ट सिटीच्या बऱ्याच अर्धवट अशास्त्रीय कामाचा शहरवासीयांना फटका बसत आहे. काही मोजके रस्ते वगळता इतर रस्त्यांची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. रस्त्या साईडची कामे करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन आपला ढिसाळ कारभार सुधारावा, योजनेचे प्रत्येक काम व्यवस्थित दर्जेदार होत आहे की नाही याची जातीने काळजी घ्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
For your Kind information smart city Ltd.( BSCL) is not doing that work …. public work department (PWD) is doing the work… being responsible news reporter try to get accurate information then upload.
The work is in progress however we commuters are in hurry to use the road somehow. We can observe many two wheelers are somehow crossing the roads in curing condition. Barricades are removed disobeying the rules. Only making complaints without giving solutions is not good.