कर्नाटकमध्ये विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या काँग्रेसची मुख्यमंत्री निवडीसाठी सुरू असलेली कसरत अखेर समाप्त झाली असून आज बुधवारी सकाळी कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री म्हणून एस. सिद्धरामय्या यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. वरिष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात समेट घडवून आणण्याची जबाबदारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपविली होती.
त्यानुसार खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काढलेल्या तोडग्यानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून एस. सिद्धरामय्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळतील.
मात्र विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील वजनदार खाती डी. के. शिवकुमार यांच्या मर्जीतील मंडळींना मिळणार असल्याचे समजते. अन्य एका सूत्रानुसार डी. के. शिवकुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांना मध्यंतरी कारावास देखील भोगाव लागला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेस हाय कमांडकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी ईश्वर आणि मातेसारखा आहे. ईश्वर आणि मातेला मुलांना काय द्यावे हे माहीत असते मी एक जबाबदार नेता आहे. माझे कर्तव्य मी निभावले आहे. पक्षाला 135 जागा जिंकून दिला आहेत. मी पक्षाशी कधीही गद्दारी करणार नाही किंवा ब्लॅकमेल ही करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.