उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे.
त्यासाठी वारणा आणि कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात तर उज्जनी जलाशयातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या तीव्र उन्हाळ्यामुळे उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमासाठी यापूर्वी कर्नाटक सरकारने वारणा आणि कोयना जलाशयातून 3.00 टीएमसी पाणी कृष्णा नदी तर उज्जनी जलाशयातून 3.00 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्याची विनंती केली होती. सदर विनंतीला मान देऊन महाराष्ट्र सरकारने मे 2023 च्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णा नदीत 1 टीएमसी पाणी सोडले आहे.
त्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचा आभारी आहे. मात्र तीव्र उन्हाळ्यामुळे उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही दूर झालेली नाही. उत्तर कर्नाटकात अद्याप मान्सूनचे आगमन व्हावयाचे आहे. सध्या या भागातील मनुष्य आणि प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे.
तेंव्हा याची दखल घेऊन आपण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तात्काळ वारणा व कोयना जलाशयातून कृष्णा नदीमध्ये 2 टीएमसी पाणी आणि उज्जनी जलाशयातून 3 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्याचा आदेश देऊन सहकार्य करावे, अशा आशयाचा तपशील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धाडलेल्या पत्रात नमूद आहे.