संपूर्ण कर्नाटकात बेळगाव शहरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अपूर्व अशा उत्साहाने श्री शिवजयंती साजरी केली जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 104 वी जयंती असून परंपरेनुसार ती मिरवणुकीने जल्लोषात साजरी करण्यासाठी बेळगाव सज्ज झाले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही श्री शिवजयंती मिरवणूक आता येत्या शनिवार दि. 27 मे रोजी होणार आहे.
बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती ही कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. भव्य मिरवणुकीने शिवजयंती साजरी करण्याची बेळगावातील परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळात 1919 मध्ये सुरू झाली. त्यावेळी प्रारंभीची कांही वर्षे बैलगाड्या सजवून संबंधित मोजक्या गल्ल्यांमध्ये शिवजयंतीची मिरवणूक काढली जात होती. मात्र त्यानंतर अल्पावधीत बेळगावातील कांही मंडळांनी एकत्र येऊन श्री शिवजयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान शिवजयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याचा हा विचार बेळगावच्या आसपासच्या परिसरात देखील पसरला. त्यावेळी नारळाच्या झाडाच्या फांद्या आणि केळीची पाने यांचा मिरवणुकीतील गाडे सजविण्यासाठी वापर केला जात होता. कालांतराने यात बदल होत गेला आणि श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या माध्यमातून स्थानिक समस्या आणि मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक घटना आणि सद्य परिस्थितीवर आधारित जिवंत देखाव्यांचेही सादरीकरण होऊ लागले. त्यामुळे हे चित्ररथ सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले.
दरवर्षी श्री शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव शहर परिसर तालुक्यासह परगावच्या नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. शिवभक्तांसह समस्त जनता आपले दैवत असलेला लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने शिवजयंती मिरवणुकीला हजारोंच्या हजेरी लावत असते. खरे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पारंपारिक शिवजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी शहरात भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
परंतु यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाने शनिवार दि. 27 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
जिवंत देखावे, लाठीमेळा, ढोल -ताशा, ध्वजपथक, लेझीम मेळा, हत्ती -घोडे अशा शिवमय वातावरणात ही चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी शिवभक्तांकडून तसेच युवक मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. अवघे 11 दिवस शिल्लक राहिल्याने साहित्याची जमवाजमव, शिवचरित्रावरील प्रसंग सादरीकरणासाठी पात्रांची निवड करण्यात युवावर्ग व्यस्त झाला आहे.
मिरवणुकीचा दिवस जवळ येत चालला असल्यामुळे चित्ररथासाठी वाहनांची चेसी मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. खुल्या मैदानांवर ढोल ताशांचा गजर घुमू लागला आहे. त्याचबरोबर बालजमू, युवती लेझीम -लाठी मेळ्याची तयारी करताना दिसत आहे. अनगोळ व वडगाव मधील कांही युवकांनी शिवकालीन युद्ध कलांचा सराव सुरू केला आहे.