सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कर्नाटकातील मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे मास्टरमाइंड कॅबिनेट मंत्री सतीश जारकीहोळी यांचे रविवारी बेळगावात आगमन होत असून जिल्ह्यातील आमदारांसह जारकीहोळी अभिमानी समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
कर्नाटक राज्य सरकारमध्ये चौथ्यांदा कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळविणारे सतीश जारकीहोळी हे सध्या राज्यातील राजकारणात सध्या ‘मोस्ट पॉवरफुल्ल लीडर’ म्हणून पुढे आले आहेत.
आपल्या लाडक्या नेत्याला यावेळी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे झालेल्या सतीश जारकीहोळी समर्थकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. जारकीहोळी यांचे रविवारी बेळगावात आगमन होणार आहे.
त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आली असून शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल, गोवावेस येथील विश्वगुरू बसवेश्वर सर्कल आणि काँग्रेस भवन येथे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे भव्य कटआउट उभा करण्यात आले आहेत. याखेरीज संगम हॉटेल रस्ता, किल्ल्या नजीकचा सम्राट अशोक चौक, संगोळी रायान्ना चौक, न्यायालयासमोरील रस्ता तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी आणि अभिनंदनाचे बॅनर भरण्यात आले आहेत.
सतीश जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यापूर्वीच चाहते आणि समर्थक यांनी त्यांचे स्वागत आणि अभिनंदनचीही सर्व तयारी करून ठेवली होती हे विशेष होय.
बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघांपैकी 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यात सतीश जारकीहोळी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सतीश जारकीहोळी यांचे स्वागत करण्यासाठी संबंधित 11 मतदार संघातील आमदार देखील सज्ज आहेत. राज्यात काँग्रेसला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याबद्दल मंत्री सतीश जारकीहोळी यांची भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे.