शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करताना महाराष्ट्रातून मराठी माणसाच्या विरोधात प्रचारास येणाऱ्या सर्वच राष्ट्रीय पक्षांचा निषेध करावा अशी मागणी केली आहे. केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांना काळी निशाणे दाखवून निषेध नोंदवावा असे ते म्हणाले.
गुरुवारी 4 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे बेळगावात सभा घेणार आहेत. फडणवीस यांची बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघात तर अशोक चव्हाण हे ग्रामीण मतदार संघात सभा घेणार आहेत.
संजय राऊत यांच्या वक्तव्या नंतर समिती नेते मंडळी कोणती भूमिका घेतात महाराष्ट्रीय नेत्यांना कसा विरोध करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी विविध प्रकारच्या कल्पना आधीपासूनच राबविल्या आहेत. सध्या भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांचे दौरे बेळगावमध्ये सुरु असून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेतेमंडळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचारासाठी येत आहेत. या नेतेमंडळींच्या विरोधात सीमावासीयांनी आक्रमक पवित्र घेतला असून बेळगाव दौऱ्यावर भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे निशाण दाखविण्याची तयारी सुरु केली आहे.
एकीकडे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संघर्ष करणाऱ्या, सातत्याने महाराष्ट्राकडे आस लावून बसलेल्या आणि महाराष्ट्राकडून सीमाप्रश्नी सकारात्मक पावलांची अपेक्षा करणाऱ्या सीमावासियांच्या पदरी महाराष्ट्राने नेहमीच निराशा पाडवली आहे. सीमाभागात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत आहे. याच समितीच्या माध्यमातून सीमावासीयांची बाजू विधानसभेत मांडण्यासाठी निवडणूक लढविली जाते. मात्र समिती उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळी बेळगावमध्ये येतात. समिती उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतात. हि दुटप्पी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांचा सीमावासीयांनी निषेध व्यक्त केला आहे.
बुधवारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यादरम्यान प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचा जाहीर निषेध नोंदवत सीमाभागात समितीच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना काळे निशाण दाखवून निषेध व्यक्त करण्याची सूचना सीमावासीयांना दिली. त्यानंतर सीमावासीयांनी सीमाभागात समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना काळे निशाण दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.