बेळगाव लाईव्ह : गेल्या २-३ आठवड्यापासून वैशाख वणव्याचे चटके सोसत असताना सोमवारी दुपारपासून बेळगावमधील विविध भागात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारीदेखील शहर परिसरात पावसाने हजेरी लावली असून गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली आहे.
रविवारपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना वळिवाच्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून तीन दिवस जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून रविवारी दुपारपासून आभाळात ढगांची दाटी झाल्याने वळीव पावसाचे संकेत मिळत होते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला पावसाने हजेरी लावली.
सोमवारी सकाळपासून अधूनमधून सूर्यदर्शन होत असले तरी दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पहिली दहा मिनिटे पावसाचा जोर होता. यानंतर काही पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हवेत उकाडा कायम होता. चारनंतर पुन्हा रिमझिम पावसाला प्रारंभ झाला.
वळिवाच्या पावसामुळे शहर-परिसर आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले होते.त्यातच विविध भागात वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहर-परिसरातील विविध भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून सायंकाळी ४ नंतर हवेत गारवा निर्माण झाल्याचे जाणवत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील गणपत गल्ली येथील कांबळी खूट यासह विविध सखल भागात पहिल्याच वळिवाच्या पावसाने गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दुर्गंधी निर्माण झाली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामाचीही पहिल्याच पावसात दैना उडाल्याने नागरीकातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
शहरी भंगारात सोमवारी ग्रामीण भागातही झालेल्या पावसाने सुमारे दोन तास झोडपून काढले असून यामुळे सर्वत्र पाणी साचले. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ देखील उडाली. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे मशागतीच्या कामांना पाऊस पोषक ठरला आहे.
.