या वेळच्या विधानसभा निवडणुकीत बेळगावच्या तीन मतदार संघामध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत वरीलपैकी कोणी नाही (नोटा), म्हणजे कोणालाही मत न घालण्याचा हक्क या पर्यायाचा सरासरी 0.78 टक्के वापर करण्यात आला आहे. मागील 2018 सालच्या निवडणुकीतील 1 टक्क्याच्या तुलनेत यावेळी नोटाचा अवलंब थोडा कमी झाला आहे.
यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघात 1599 नोटा मतांची नोंद झाली असून जो एकूण मतदानाच्या 1 टक्का आहे. त्यामुळे मागील 2018 पासून या मतदारसंघातील नोटा मतांमध्ये फरक पडलेला नाही.
त्याचप्रमाणे बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये एकूण मतदानाच्या 0.57 टक्के म्हणजे 1165 नोटा मतांची नोंद झाली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात एकूण मतदानाच्या तुलनेत 1161 म्हणजे 0.78 टक्के नोटा मते पडली आहेत.
निवडणूक रिंगणातील एकाही उमेदवार स्वतःच्या मते पात्रतेचा नसेल. त्यासाठी एकाही उमेदवाराला मतदान न करता आपली नाराजी व्यक्त करायची असेल तर भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांना पर्याय म्हणून नोटाला मतदान करण्याची मुभा दिली आहे. या वेळच्या निवडणुकीतही नोंदवल्या गेलेल्या नोटा मतांची संख्या कमी असली तरी इतके मतदार आपल्या मतदानाच्या अधिकाराचा परखडपणे वापर करू शकतात ही बाब लक्षणीय म्हणावी लागेल. बेळगावच्या तीन विधानसभा मतदार संघात मागील आणि या वेळच्या निवडणुकीत नोंदवली गेलेली नोटा मतांची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. बेळगाव दक्षिण :2023 -1.00%, 2018 -1.00%. बेळगाव ग्रामीण :2023 -0.57%, 2018 -1.05%. बेळगाव उत्तर :2023 -0.78%, 2018 -0.92%.
बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदविल्या गेलेल्या नोटा मतांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. रायबाग -1860, रामदुर्ग -1646, बेळगाव दक्षिण -1599, सौंदत्ती -169, अथणी -1037, बेळगाव ग्रामीण -1165, बैलहोंगल -1319, गोकाक -160, यमकनमर्डी -996, कागवाड -985, चिक्कोडी सदलगा -957, कुडची -643, खानापूर -1236, निपाणी -919, हुक्केरी -1168, बेळगाव उत्तर -1161 आणि कित्तूर -802.
‘नोटा’ला मतदान केल्यानंतर सरासरी मतदान टक्केवारीत ग्राह्य धरले जाते. मात्र रिंगणातील उमेदवारांच्या मतदानात त्याचा समावेश होत नाही. तथापि या स्वरूपाच्या मतदानामुळे उमेदवारांचा निसटता पराभव होण्याची शक्यता असते. यासाठी निवडणूक विभागाकडून नोटाची जागृती केली जात नाही.