बेळगाव लाईव्ह : निपाणी विधानसभा मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी विजयाचे खाते उघडले असून शशिकला जोल्ले यांनी विजयाची हॅटट्रिक मारली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी शशिकला जोल्ले यांना शर्थीची लढत दिली.
मात्र शेवटी शशिकला जोल्ले यांच्याच विजयाचा गुलाल उधळला असून या मतदार संघाच्या मतमोजणीदरम्यान आघाडी आणि पिछाडीच्या डावाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
या मतदार संघात शशिकला जोल्ले यांनी बाजी मारली असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तम पाटील आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे काकासाहेब हे आहेत. उत्तम पाटील यांच्या प्रचासाठी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी उपस्थिती दर्शविली होती. याचप्रमाणे जयंती पाटील यांनीही जाहीर सभा घेत विजयाचा दावा केला होता.
तर शशिकला जोल्ले यांच्यासाठी स्मृती इराणी यांनी हजेरी लावली होती. मतमोजणीदरम्यान शशिकला जोल्ले आणि उत्तम पाटील यांच्यातील मतांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली होती. अवघ्या २००-३०० मतांच्या फरकावर सुरु असलेल्या लढतीमुळे या मतदार संघाच्या निकालाकडे प्रत्येकाच्या नजरा खिळल्या होत्या.
सरते शेवटी राष्ट्रवादीचे उत्तम पाटील यांचा पराभव होऊन शशिकला जोल्ले यांचे पारडे जड ७२९५२ मते घेऊन त्या विजयी ठरल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे उत्तम पाटील यांना ६५६१४ मतांवर समाधान मानावे लागले आहे.