महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शास्त्रीनगर येथील नाला सध्या केरकचरा आणि गाळाने प्रचंड प्रमाणात सांडपाण्याने तुंबला आहे. घाणीने तुंबलेल्या या नाल्यामुळे आसपास दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरातील गटारी आणि नाल्यांची वेळोवेळी साफसफाई करण्याकडे महापालिकेकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सांड पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दरवर्षी गटारींसह शहरातील नाल्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात गाळ, घाण -केरकचरा तूंबला होता याची माहिती जेंव्हा मुसळधार पाऊस पडतो तेंव्हा मिळते.
घाण केरकचरा तेंव्हा रस्त्यावर पसरलेला असतो. अतिवृष्टी झाली की मग या गटारी -नाल्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी आसपासच्या घराघरात फिरून जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्वांची कल्पना असूनही नालासफाईकडे दुर्लक्ष करत दरवर्षी महापालिकाचे वर्तन ‘ये रे माझ्या मागल्या’ असे असते.
व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्यामुळे शास्त्रीनगर येथील नाल्यातील पाणी दरवर्षी पात्र बाहेर येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. आता सध्या देखील महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा नाला गाळ आणि केरकचऱ्यामुळे सांडपाण्याने मोठ्या प्रमाणात तुंबला आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी केंदळ फोफावले आहे. नाल्याच्या दुतर्फात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे एकंदर या नाल्याला बकाल स्वरूप प्राप्त होऊन परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. याखेरीस तुंबलेल्या सांडपाण्यामुळे डास -माशांचा प्रादुर्भाव वाढवून नाल्या शेजारी घरी असलेल्या नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर नाल्याची इतकी खराब अवस्था असूनही महापालिका प्रशासन अद्याप सुस्तच असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
मे महिन्याचा मध्यावधी उलटून गेला लवकरच जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मात्र अद्यापही शास्त्रीनगर येथील नाल्याची किंवा शहरातील अन्य नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असून पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
नालासफाई संदर्भात बेळगाव लाईव्हने प्रशासनाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले शहरातील जागरूक नागरिक विकास कलघटगी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, हवामान खात्याचा अंदाजानुसार येत्या 6 जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी युद्धपातळीवर नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई केली जाते आणि त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च दाखवला जातो. मात्र नाल्यांची खरोखर चांगल्या प्रकारे स्वच्छता केली जाते का? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सध्या प्रचंड तुंबलेला शास्त्रीनगर येथील नाला पाहिला तर त्याची स्वच्छता कित्येक महिन्यात झालेली नाही हे सहज लक्षात येते. या पद्धतीचे अस्वच्छ नाले जनतेचे आरोग्य बिडवण्यास कारणीभूत ठरत असून त्यामुळे सध्याच्या घडीला आजार वाढवून दवाखान्यात नागरिकांची गर्दी होत आहे.
तेंव्हा महापालिका आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या आरोग्य विभागाला युद्धपातळीवर नाल्यांची साफसफाई करण्याचे तसेच कांही ठिकाणी नाल्यामध्ये झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले पाहिजेत, असे मत विकास कलघटगी यांनी व्यक्त केले.