राज्यात काँग्रेसचे नवे सरकार आल्यानंतर बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विकासासंदर्भात मंत्रिमहोदयांकडून सुवर्ण विधानसौध येथे घेतल्या जाणाऱ्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रामुख्याने सर्वप्रथम बळ्ळारी नाला साफसफाई आणि विकासाबाबत चर्चा केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर विकासासंर्भात उद्या सुवर्णसौध येथे होणाऱ्या मंत्रीमहोदय तसेच संबधीत अधिकाऱ्यांच्या बैठकीत बळ्ळरी नाला साफसफाईची चर्चा केली जावी. कारण दरवर्षी पावसाळ्यात नाला परिसरात येणाऱ्या पुराने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान होत असते. यंदा हे नुकसान टाळण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जेसीबी लावून नाल्यातील गाळ काढल्यास थोड्याप्रमाणात तरी शेतकऱ्यांची पीकं वाचून त्यांना समाधान मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
आता पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे सरकार प्रशासनाने सर्वप्रथम तुर्तास बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी व गाळ काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कारण पावसाळा संपल्यावर इतर कामं करता करता येऊ शकतात.
मात्र बळ्ळारी नाल्याची सफाई झाली नाही तर यंदाही पुराचा धोका उद्भवणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर येळ्ळूर रस्ता येथे बळ्ळारी नाल्याच तोंडच बंद झाल्यामुळे अनगोळ, येळ्ळूर, मजगाव शिवारातून तसेच वडगाव, अनगोळ, टिळकवाडी आणि चन्नम्मानगर येथून येणारे पावसाचे पाणी निचरा होण्याचा मार्गच बंद आहे.
परिणामी पावसाळ्यात नाल्याला पूर येऊन पाण्याचा लोंढा परिसरातील पीकंतर जाणारच पण तेथील वस्तीतून पाणी शिरण्याची भिती आहे. त्यासाठी हा संभाव्य धोका ओळखून प्रशासन व मंत्रीमहोदयांनी प्रत्यक्ष पहाणी करुन मार्ग काढावा आणि संभाव्य पूर परिस्थिती टाळावी, अशी शेतकरी व जनतेची मागणी आहे.