न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आपल्या माणसाला आमदार म्हणून पाठवायचे त्यावेळी तुम्ही एकजुटीने एकत्र आला नाहीत तर पुढील 5 वर्षे पस्तावा करून घेण्याशिवाय तुमच्या हातात कांही राहणार नाही. तेंव्हा वेळीच शहाणे व्हा. आपल्या अस्मितेसाठी, आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन ॲड. अमर येळळूरकर यांच्यासह म. ए. समितीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणा, असे आवाहन महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केले.
शहरातील हेमू कलानी चौक येथे काल सोमवारी आयोजित बेळगाव उत्तरमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळळूरकर यांच्या प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर, रेणू मुतकेकर आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात आमदार लंके म्हणाले की, ही निवडणूक आपण मराठी भाषेसाठी, न्यायासाठी लढवत आहोत हे सर्वात महत्त्वाचे आहे.
या निवडणुकीमध्ये आपल्याला मराठी भाषिकांचा सन्मान करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. सीमा लढ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आता आपण खऱ्या अर्थाने संघटित झाले पाहिजे आणि समितीच्या उमेदवाराला निवडून आणले पाहिजे. समितीचा हा उमेदवार तर स्वतः वकील आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला आपले खटले लढवण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जावे लागणार नाही. कारण त्यांचा हक्काचा माणूस वकील आहे आणि या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून पाठवले तर बेळगावसह सीमा भागातील समस्या सुटल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा विश्वास आहे.
आपला उमेदवार ॲड. अमर येळळूरकर यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. छ. शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्यांचा अवमान केल्या जाणाऱ्या या प्रदेशात आपण आपल्या अस्मितेसाठी आपल्या न्याय हक्कांसाठी एकत्र आले पाहिजे आणि आपल्या या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून दिले पाहिजे. बऱ्याचदा जेंव्हा संघटित होणे अत्यावश्यक असते त्यावेळी आपण संघटित होत नाही आणि मग नंतर दबल्या आवाजात आमच्यावर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे असे रडगाणे गातो. अरे ज्यावेळी तुम्हाला संघटित होणे गरजेचे होते. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या माणसाला आमदार म्हणून पाठवायचे होते त्याचवेळी तुम्ही एकजुटीने एकत्र आले नाही तर पुढील 5 वर्षे पस्तावा करून घेण्याशिवाय तुमच्या हातात कांही राहणार नाही. तेंव्हा उपस्थित सर्वांनी जे या ठिकाणी हजर नाहीत अन्यत्र केले आहेत त्यांना सांगा की आता आपण एकजुटीने राहिले पाहिजे. आता तरी शहाणे व्हा.
ही निवडणूक फक्त ॲड. अमर येळ्ळूरकर यांना आमदार करण्यासाठी नाही तर माझ्या मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. तेंव्हा आपल्या हक्काचा आपल्या विचारांचा माणूस जर विधिमंडळात आमदार म्हणून पाठवला तर आपण गेल्या अनेक वर्षापासूनच्या आपल्या समस्या अडचणी सोडवू शकतो. सीमालढा आपल्याला शेवटपर्यंत पुढे न्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित राहून ॲड. येळ्ळूरकर यांना निवडून देणे गरजेचे आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह घागर आहे. त्या समोरील बटन दाबा आणि त्यांना विजयी करा. जाता जाता सांगतो आता तरी शहाणे व्हा, एकजुटीची ताकद दाखवून येत्या निवडणुकीत आपल्या विचाराचा म. ए. समितीचा उमेदवार विधिमंडळात पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही ही शपथ या सभेच्या निमित्ताने घ्या, असे आवाहनही शेवटी आमदार निलेश लंके यांनी केले. सभेला हेमू कलानी चौक परिसरासह शहरातील समिती कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.