बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक विद्यमान आमदार विजयी झाले असून आता मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनेक आमदार दिल्ली – बेंगळुरू च्या वारीत दंग झाले आहेत. बेंगळुरूर येथील विशेष अधिवेशन २४ मे रोजी झाले असून आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
मागील आठवड्यात डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील चढाओढीनंतर मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर त्यांनी तीन दिवसांचे अधिवेशन बोलाविले. २२ ते २४ मे या दरम्यान अधिवेशन पार पडले.
बेंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु होती. च्छुकांतर्फे मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळावी, अशी मागणी नेत्यांकडे करण्यात येत होती. अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी आमदारांची फिल्डिंग सुरु झाली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन फिल्डिंग लावण्यात सध्या अनेक आमदार व्यस्त असून हा विषय आता हायकमांड टेबलावर पोचला आहे. यामुळे इच्छुकांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. शुभेच्छा व गाठीभेटी घेण्यासह मंत्रिपदी संधींबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रस्ताव हायकमांडला पाठवून अंतिम निर्णयाच्या दृष्टीने दिल्लीत हालचाली सुरु झाल्या असून बेंगळुरू येथे फिल्डिंग लावलेल्या आमदारांनी आता दिल्ली दौरा आखला आहे.
राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून बहुतांशी ठिकाणी विद्यमान आमदारांची पुन्हा आमदारपदी वर्णी लागल्याने पक्षातील इच्छुकांची यादी वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी पाचजणांनी दावा केला असून त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातून तिघांची नावे मंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत. यात लक्ष्मण सवदी, प्रकाश हुक्केरी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावांचा समावेश आहे.
यांच्यासह आमदार अशोक पट्टण व महांतेश कौजलगी यांचीही नवे चर्चेत आहेत. येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त करण्यात येत असून हायकमांड मंत्रीपदी कोणाची वर्णी लावते आणि कोणाला निगमपद देऊन आमदारांचे समाधान करते, हे पाहणे खूप औत्सुक्यतेचे ठरणार आहे.