बेळगाव शहरात उद्या होणाऱ्या ऐतिहासिक श्री शिवजयंती मिरवणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत असून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी आज शुक्रवारी सकाळी मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला. तसेच नागरिक आणि शिवप्रेमींची गैरसोय न होता मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
शहरात उद्या होणाऱ्या श्री शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी सकाळी बेळगाव उत्तरचे अर्थात शहराचे आमदार राजू सेठ यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत पोलीस उपायुक्त टी. एस. शेखर, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, महापालिकेच्या वरिष्ठ अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह हेस्कॉम व अन्य खात्यांचे अधिकारी त्याचप्रमाणे श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, राजू कडोलकर, अमित जाधव आदी उपस्थित होते.
नरगुंदकर भावे चौक येथून आमदार सेठ यांनी आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक असा आमदारांचा पायी दौरा पार पडला.
सदर पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार राजू सेठ यांनी श्री शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी येणारे नागरिक आणि शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी ठीक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची सूचना मनपा आयुक्तांना केली. त्याचप्रमाणे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा व्यवस्थित सुरक्षित करण्याबाबत सूचना केली. याखेरीज आवश्यक ठिकाणी फोकस अर्थात प्रकाश झोताचे दिवे बसविण्यात यावेत असे असे सांगून त्यांनी अन्य कांही सूचना केल्या.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना आमदार असिफ उर्फ राजू सेठ म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सर्व जाती-धर्माच्या आणि भाषेच्या लोकांनी सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शांततेने चांगल्या उत्साही वातावरणात पार पाडूया. आपण सर्वांनी मिळून चांगल्या सुंदर पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याद्वारे छ. शिवाजी महाराज आमच्या देशाचे एक महापुरुष आहेत हे दाखवून देऊया.
तेंव्हा माझी समस्त जनतेला विनंती आहे त्यांनी या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपण सर्वांनी मिळून छ. शिवाजी महाराजांना चांगली मानवंदना देऊया, असे आमदार सेठ शेवटी म्हणाले.