बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची चिंतन बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत समितीशी गद्दारी करून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या तिघांची हकालपट्टी करण्यात आली. याचप्रमाणे माजी आमदार आणि म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर तसेच एम. जी .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून नंतर नवी कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, रामचंद्र मोदगेकर, सरस्वती पाटील, एम. जी. पाटील, सुधीर चव्हाण, संतोष मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय मनोहर किणेकर यांनी जाहीर केला.
त्यावर कार्यकर्त्यांनी तुम्ही नवीन कार्यकारिणी होई पर्यंत आपण पदावर राहावे अशी सूचना केली. मनोहर किणेकर आणि एम. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येईल, असा निर्णय उपस्थितांनी घेतला. यामुळे मनोहर किणेकर यांनी आपला राजीनामा तात्पुरता मागे घेतला. यावेळी तालुका युवा आघाडीचे समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या बैठकीत माजी तालुका पंचायत सदस्य एस. एल. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरोजिनी चौगुले, अशोक बसवंत चौगुले या तिघांनीही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. या तिघांच्या विरोधात ठराव मांडून सर्वानुमते संमत करण्यात आला. यावेळी या तिघांचीही समितीतून हकालपट्टी करण्याच्या ठरावाला टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते संमती देण्यात आली.
विधानसभा निवडणूक असो किंवा कोणीतही निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समितीकडे देणग्यांचा ओघ सुरूच असतो. लोकवर्गणीतून पुढे जाणारी हि संघटना निवडणुकीच्या काळात नेते मंडळी कडून महाराष्ट्रातून आणलेल्या मदत निधी बाबत निवडणुकीत समिती कार्यकारिणीकडे जमा झालेल्या निधीच्या हिशोबाची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सभागृहात सुरु असलेली ऐकायला मिळाली. मात्र उघडपणे याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत निधी बाबत उघडपणे चर्चा करणार असल्याचेही कार्यकर्ते बोलत होते.