” प्रत्येकाच्या जीवनात तीन स्त्रिया येतात एक म्हणजे आपली आई जी आपल्याकडून काहीच मागत नाही मात्र आपल्या मुलासाठी काहीही करते, दुसरी म्हणजे पृथ्वी जी आपल्याला हवे ते देते आणि तिसरी म्हणजे आपली शाळा- म्हणजेच विद्यादेवी सरस्वती, जिच्यामुळे आपण सुसंस्कारीत होतो त्यामुळे या तीन स्त्रियांचं जीवनातलं योगदान फार मोठं असतं .शाळेमध्ये तुमच्या जीवनाच्या यशाचं बी पेरलं जातं म्हणूनच आपल्या जीवनाच्या यशस्वीतेमध्ये शाळेचं योगदान अतिशय महत्त्वाच आहे. माझ्या भविष्याचा पाया या शाळेत घातला गेला त्यामुळे मी या माझ्या शाळेचा शतक महोत्सव साजरा करीत असताना नतमस्तक होते आज मला पन्नास वर्षांपूर्वीचा काळ आठवतो ,मी या माझ्या शाळेला एक लाख रुपयाची देणगी जाहीर करते “अशा शब्दात पद्मश्री डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बेळगाव येथील महिला विद्यालय मंडळाच्या आणि महिला विद्यालय हायस्कूलच्या शतक महोत्सवी समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर इंदिरा हिंदुजा या उपस्थित होत्या. त्या महिला विद्यालय शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी च्या निर्मात्या आहेत .
महात्मा गांधी भवन ,कॉलेज रोड बेळगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दुसऱ्या अतिथी व वक्त्या म्हणून मराठी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड या उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री भगवानदास कपाडिया हे होते. दोन दिवस चालणाऱ्या या शतक महोत्सव समारंभाचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटात आणि संस्थेच्या अनेक आजी माजी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला. व्यासपीठावर संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह संचालक गोविंदराव फडके, विवेक तीनैकर व मुख्याध्यापक स्थानापन्न झाले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. निशिगंधा वाड यांनी उपस्थितांशी हितगुज करीत आपल्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. “शाळा ही ज्ञानगंगा असून चांगल्या कामाची परिमिती नेहमी ज्ञानामध्ये होत असते असे सांगून त्या म्हणाल्या की, आज जरी हे जग पुरुष प्रधान असलं तरी सुद्धा महिलांचं विशेष योगदान आपल्याला विसरून चालत नाही. आज काळ वेगाने बदलतोय याचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळेच आज मल्टिनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा मुली वेगवेगळ्या हुद्यावर काम करीत असलेल्या दिसतात .
या शाळेने जगात भारताच नाव मोठे करणाऱ्या डॉक्टर इंदिरा अहुजा यांच्यासारख्या अनेक विद्यार्थिनी घडविल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात या शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे सांगून डॉक्टर वाड म्हणाल्या की, ज्या काळात बाईला माणसासारखं वागवलं जात नव्हतं त्या काळात बनुताई आहो यांनी समाजात घरोघर जाऊन मुलींना शिकवण्यासाठी आणलं आणि अनेकजणी शिकू शकल्या, त्या महर्षी कर्वे ने सुरु केलेल्या आणि बनूताई आहो नी वाढविलेल्या शाळेच्या शतक महोत्सवासाठी येऊन उभा राहण्याचे भाग्य मला लाभलं याचा मला अतिशय आनंद होतो. असे त्या म्हणाल्या “झाशीची राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातल्या अनेक आठवणी कथन करून त्या म्हणाल्या की, वृक्ष म्हणून फुलण्याची इच्छा असेल तर आकाशी झेप घेतली पाहिजे ,आज महिला सबलीकरणाच्या विश्वात आपण वावरत असताना अंधाराचा नाश करीत नवीन काहीतरी निर्माण केलेल्या अशा शाळा निर्माण करणाऱ्या स्त्रीत्वाला, अशा सत्वाला प्रभुत्वाला ,मातृत्वाला आणि पूर्णत्वाला मी मानाचा मुजरा करते “असे सांगून निशिगंधा वाड यांनी आपले अतिशय प्रभावी असे व्याख्यान संपवले. त्यांच्याच हस्ते शतक महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या ‘शततरंग’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, रामरक्षा पठण, स्वागतगीत व शाळागीताने झाली. सरस्वती पूजन करण्यात आल्यानंतर संस्थेचे संस्थापक असलेले महर्षी अण्णासाहेब कर्वे ,बनुताई आहो आणि इतर मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला विद्यालय हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉक्टर शोभा शानभाग यांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर हिंदुजा आणि डॉक्टर निशिगंधा वाड यांचा पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व शाल अर्पण करून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक व्ही एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याचबरोबर संस्थेच्या उभारणीत कार्य करीत असलेल्या विद्यमान संचालक व इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्यांचाही सन्मान करण्यात आला. संस्थेचे कार्यवाह विवेक कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले आणि संस्थेचा इतिहास त्यांनी कथन गेला “27 मे 1923 रोजी महिला विद्यालय मंडळाची सुरुवात झाली आणि त्यानंतर दोनच दिवसांनी महिला विद्यालय हायस्कूलची सुरुवात करण्यात आली. असे सांगून ते म्हणाले की “आज भारताच्या राष्ट्राध्यक्ष एक आदिवासी महिला आहेत, देशाच अर्थकरण पाहिणाऱ्या सुद्धा महिला आहेत, यूपीएससी परीक्षेत पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण होणाऱ्या महिला आहेत , त्याचबरोबर आज इतर अनेक महिला उच्च पदावर आरूढ झालेल्या आहेत असे असले तरी सुद्धा शंभर वर्षांपूर्वी स्त्री शिक्षण हे एक मोठे आव्हान होते, त्याकाळी असलेल्या जुन्या चालीरीती ,रूढी परंपरा या स्त्री शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या नव्हत्या ,पण महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेऊन पुण्यामध्ये 1916 साली त्या कार्याची सुरुवात केली आणि त्यानंतर ते बेळगावात आले आणि बेळगावात त्यांनी आपल्या शिष्या बनुताई आहो ना बोलावून घेतलं आणि येथील मान्यवरांच्या सहकार्याने महिला विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आज इंग्रजी भाषेचं स्तोम वाढलेले असले तरीसुद्धा मराठी भाषा टिकवण्याचं काम आपल्याला करण्याची गरज आहे” असे सांगून त्यांनी उपस्थितांचं स्वागत केलं.
संस्थेचे सहकार्यवाह अॅड. सचिन बिच्चू यांनी आपल्या भाषणात महिला विद्यालयाच्या उभारणीत कार्य करण्यात पुढाकार घेतलेले दत्तोपंत बेळवी, वामनराव खोत, बंडोपंत कुलकर्णी ,डॉ. गोविंदराव हेरेकर यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ.जयंत गिरीश हेरेकर यांनी आपल्या पणजी गिताबाई हरेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेला गेल्यावर्षी पाच लाख रुपये दिल्यामुळे संस्थेच्या हॉलचे नूतनीकरण करता आले अशी माहिती यावेळी दिली .समारंभाचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया यांनी आपल्या भाषणात बनूताई आहो ,प्रभाताई देशपांडे यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला .अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता अॅडवोकेट विवेक कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास देशाच्या विविध भागातून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .
गदुसऱ्या सत्रात आजी-माजी विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
*रविवारचे कार्यक्रम*
आज रविवार दि. 28 मे रोजी सकाळी नऊ वाजता माजी विद्यार्थिनींचा आनंद सोहळा साजरा होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर शोभा शानभाग या राहणार आहेत तर व्याख्यात्या म्हणून डॉ. माधुरी शानभाग उपस्थित राहणार आहेत. माधुरी शानभाग यांचे ‘कालातीत बहिणाबाई :नवा दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान होणार असून माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर माजी विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महिला विद्यालय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे