बेळगाव लाईव्ह : जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आली असून, मतदान केंद्राची स्थापना आणि मतदार यादी तयार करण्याचे आदेश शुक्रवारी बजावण्यात आले आहेत.
जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या मतदार यादीचे काम हाती घेतले जात असून यंदा या दोन्ही मतदारसंघासाठी बिदर, कारवार आणि बेळगाव जिल्ह्यातील मराठीबहुल मतदारसंघात मराठी भाषेत देखील मतदार यादी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने बजावले आहेत.
दरवेळी पंचायतीच्या निवडणुकीला मराठी भाषिकांना तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन मराठी भाषेत देखील मतदार यादी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करावी लागत होती. त्यानंतर आलेल्या निवेदनांचा स्वीकार करून कन्नडमध्ये उपलब्ध असलेली मतदारयादी मराठी भाषेत देखील भाषांतरित करून दिली जात होती. मात्र, यंदा प्रथमच राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी तयार करण्याचे आदेश बजावतानाच बिदर, कारवार आणि बेळगावमधील मराठी भाषिक मतदारांना मतदारयादी मराठी भाषेतच उपलब्ध करून देण्याचे आदेश बजावले आहेत.
तालुका पंचायतीची मतदार यादी जिल्हा पंचायतीच्या मतदार यादीचा भाग असते. तर जिल्हा पंचायतीची मतदार यादी विधानसभा मतदार यादीच्या आधारावर तयार केली जाते. तालुका आणि जिल्हा पंचायत मतदार संघ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या सीमा निर्णय आयोगाच्या अधिसूचनेनुसार मतदार यादी तयार केली जाणार आहे. विधानसभेची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे. हा डेटा वापरूनच जिल्हा पंचायत मतदार संघाची यादी तयार करण्याची सूचना आहे.
राज्य निवडणूक आयोगाने बजावलेला आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना १४ जून रोजी कच्ची मतदार यादी जाहीर करावी लागेल. त्यावर १९ जून पर्यंत अक्षय दाखल करता येणार असून २२ जून रोजी आक्षेप निकाली काढले जाणार आहेत. त्यानंतर २७ जून रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
तर विधानसभा मतदानासाठी वापरण्यात आलेले मतदान केंद्र तालुका आणि जिल्हा पंचायत मतदान केंद्रासाठी वापरले जाण्याची सूचना करण्यात आली आहे.