बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत २२४ जागांसाठी तब्बल २६१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा एप्रिल महिन्यात झाली असून १३ एप्रिलपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची अंतिम मुदत होती. त्यानंतर २१ एप्रिल रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. २४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. या सर्व प्रक्रियेनंतर एकूण अंतिम यादीनुसार २६१५ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
प्रारंभी ५१०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर एकूण २६१५ उमेदवार अंतिम टप्प्यात पोहोचले असून यापैकी २४३० पुरुष उमेदवार तर १८४ महिला उमेदवार आहेत. तर १ तृतीयपंथी उमेदवाराचादेखील समावेश आहे. यामध्ये भाजपचे २२४, काँग्रेसचे २२३, आम आदमी पक्षाचे २०९, कम्युनिस्ट पक्षाचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे २, बहुजन समाज पक्षाचे १३३, जनता दलाचे २०९, कर्नाटक राष्ट्र समितीचे १९५, उत्तम प्रजकीय पार्टीचे ११०, कल्याण राज्य प्रगती पक्षाचे ४६, इंडियन मुव्हमेंट पार्टीचे ३२, सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे १६, समाजवादी पार्टीचे १४, सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) १४, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे १२, इतर राजकीय पक्षाचे २५४, आणि ९१८ अपक्ष असे एकूण २६१५ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदार संघासाठी १३ महिला आणि १७४ पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण ५,३१,३३,०५४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.