बेळगाव लाईव्ह : गेल्या ३० वर्षांपासून आपण भाजपमध्ये निष्ठेने कार्य केले. मात्र भाजपाला ज्येष्ठ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कदर नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली. बेळगावमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले जगदीश शेट्टर यांनी भाजपवर टीका करत काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
बेळगावमधील महंत भवन येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. जगदीश शेट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे आधीच खळबळ माजली आहे. बेळगाव उत्तर मतदार संघात सध्या सुरु असलेल्या लिंगायत समाजाच्या राजकारणादरम्यान जगदीश शेट्टर यांची हजेरी चर्चेचा विषय बनला होता.
यावेळी उत्तर मतदार संघातील जनतेला राजू सेठ यांना बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. जगदीश शेट्टर यांनी कित्तूरसह खानापूर, बेळगावमधील विविध मतदार संघात प्रचाराचा धडाका लावला आहे. बजरंग दलावर बंदी घालण्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना, बंदी घालण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसून केंद्र सरकारचा असल्याचे मत व्यक्त केले.
जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, भाजपमध्ये गेल्या ३० वर्षांपासून कार्यकर्ते जोडण्याचे काम आपण केले. मात्र भाजपने मला विश्वासात न घेता निर्णय घेतले. आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याची सडकून टीकाही त्यांनी केली. काँग्रेस हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे.
या पक्षात आपण स्वाभिमानाने प्रवेश घेतला असून राज्यात या निवडणुकीत १३० मतदार संघात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वासही जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. यावेळी शशिकांत नाईक, व्ही. एन. साधूनवर, अशोक सदलगी, संजय पट्टनशेट्टी, माजी आमदार फिरोज सेठ आदींसह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.