बेळगाव लाईव्ह : कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने बेळगावमध्ये के एल इ जिरगे हॉल येथे ९ ते ११ जून या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या तसेच पब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक एच.आर.रंगनाथ हे असणार आहेत.
आज आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे बेळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी हि माहिती दिली आहे. या कार्यशाळेत राज्याच्या विविध भागातून सुमारे ३०० पत्रकार सहभागी होणार असून कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी आगाऊ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते होणार आहे. याचप्रमाणे या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आदींची उपस्थिती असेल.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनचे मानद अध्यक्ष डॉ. भीमशी जारकीहोळी हे असतील. प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत, श्रीलंकेच्या पर्यटन मंत्री विथिका हेरथ, कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष शिवानंद तागादुरा, बी.व्ही. मल्लिकार्जुनैया आणि इतर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस भीमशी जारकीहोळी, श्रीशैला मठद, मंजुनाथ पाटील, नौशाद विजापुरे, श्रीकांत कुबकड्डी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.