गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीमा भागातील प्रतिथयश लेखक गुणवंत मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे हे संमेलन मसूर (जि. सातारा) येथे ११ जून रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ असा लौकिक असलेल्या गुंफण अकादमीच्या वतीने सातत्याने गोवा तसेच सीमा भागात साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे संमेलन अठरावे आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी गुणवंत पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
मूळचे सांगली जिल्ह्यातील डफळापूर (ता. जत) येथील असलेल्या गुणवंत पाटील यांचे शिक्षण कोल्हापुरात विद्यापीठ हायस्कूल, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, न्यू कॉलेज आदी ठिकाणी झाले आहे. गेली अनेक वर्षे ते कथा, कविता, समीक्षा, पुस्तक परिचय, सदर लेखन असे विविधांगी लेखन करत आले आहेत. अनेक दिवाळी अंकांच्या संपादनात तसेच साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सहभाग राहिला आहे. ‘भरळ’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र शासनाचा ग. ल. ठोकळ पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर खंडू पाटील पुरस्कार, बेळगावच्या वाड्मय चर्चा मंडळाचा वि. ना. मिसाळ पुरस्कार, नारायण सुर्वे वाचनालय (नाशिक) यांचा पुरस्कार यासह २५ साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सोने – चांदी परीक्षण, दूध, शेती इत्यादी व्यवसायातही लौकिक असलेल्या पाटील यांचे व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक राज्यात वास्तव्य राहिले आहे. गुंफण संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.