काँग्रेस पक्षाकडून कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? हे अद्याप निश्चित झाले नसले तरी 33 संभाव्य कॅबिनेट मंत्र्यांची नावे या पक्षाकडून निश्चित झाल्याचे समजते.
त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह चौघांचा समावेश असल्याचे कळते.
जिल्ह्यातील अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी या दोघांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार असे चित्र आहे. माजी मंत्री विद्यमान विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचे नांवही मंत्रीपदासाठी चर्चेत होते.
मात्र सध्या कॅबिनेट मंत्री म्हणून या 35 जणांची यादी तयार करण्यात आली आहे त्यातील सर्वजण विधानसभा सदस्य आहेत. हल्याळ मतदारसंघातून 9 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आर. व्ही. देशपांडे यांचे मंत्रीपद हे निश्चित झाले आहे. यापूर्वी मंत्री म्हणून चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसच्या अनुभवी आमदारांचाही संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे.
राज्यात 2019 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात चार मंत्री होते. त्यावेळी लक्ष्मण सवदी, शशिकला जोल्ले, रमेश जारकीहोळी व श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद मिळाले होते. त्याची पुनरावृत्ती यावेळी काँग्रेस सरकारच्या काळात होऊ शकते. या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्याचा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे.