बेळगाव लाईव्ह : खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात श्रीनिवास फॅक्टरी च्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या बोंगाळे कुटुंबियातील १३ वर्षीय बालिकेचा हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गेला आहे.मधुरा केशव मोरे (वय १३) या बालिकेचा विजेच्या धक्क्याने सोमवारी मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार सदर बालिका आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत खेळताना हा प्रकार घडला आहे. नेहरू नगर येथील कृष्णा बोंगाळे यांच्या घरासमोरून हेस्कॉमची हाय व्होल्टेज केबल गेली आहे. यापूर्वी देखील बोंगाळे कुटुंबियातील सदस्याला अशाचपद्धतीने विजेचा झटका लागला होता.
हि केबल खाजगी जागेतून गेली असून, ती हटविण्यासाठी स्थानिक आमदार आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रार केली आहे. हि केबल हटविण्यासाठी १० टक्के रक्कमदेखील नियमानुसार भरण्यात आली आहे. मात्र हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अद्याप हि केबल हटविण्यात आली नाही.
मूळ येळ्ळूर, राजहंसगड येथे राहणारी आणि सध्या वडिलांच्या कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक असणारी मधुरा हि आपल्या आजोळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आली होती. खेळता खेळता मधुराचा हात हाय वोल्टेज केबलला लागला आणि पाहताक्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली आणि जळून खाक झाली.
गेल्या २ वर्षांपासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे आज एका मुलीला जीव गमावण्याची वेळ आली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला आहे.सुट्टीत आजोळी आलेल्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.