पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर आपत्ती निवारण सभेचे आयोजन केले जावे.
त्या सभेमध्ये संबंधित तालुक्यात पावसाळ्यामध्ये उद्भवू शकणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासंदर्भात चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक तयारी केली जावी. बेंगलोर सारखी दुर्घटना जिल्ह्यात घडणार नाही याची दक्षता घेतली जावी. त्याचप्रमाणे वीज पुरवठ्याच्या बाबतीत देखील कोणतीही दुर्घटना करणार नाही याची खबरदारी घ्यावी. तुटून जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारेमुळे जीवितहानी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेतली जावी.
पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने शहर आणि उपनगरातील नाले आणि मोठमोठ्या गटारींच्या स्वच्छतेचे काम तात्काळ हाती घेतले जावे. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे रस्त्याशेजारी झाडे उन्मळून पडल्यामुळे किंवा झाडाच्या फांद्या तुटून पडल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यासाठी सर्वेक्षण करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी जीर्ण झालेली झाडे आणि धोकादायक फांद्या हटविण्यात याव्यात अशी सूचना करून सध्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांना टँकरने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि स्थानिक मुख्याधिकाऱ्यांना केली.
जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सत्वर सहाय्यासाठी कंट्रोल रूमची स्थापना केली जावी. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका पातळीवर असे कंट्रोल रूम्स सुरू करण्यात यावेत. जिल्ह्यातील कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा वगैरे सर्व नद्यांच्या पाणी पातळीवर बारीक लक्ष ठेवले जावे. युद्धपातळीवरील सहाय्यासाठी आवश्यक असणाऱ्या बोटी, जेसीबी आदी उपकरणे याबाबतीत सर्व प्रकारची पूर्व खबरदारी घेतली जावी. पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावातील लोकांना सुरक्षित आसरा देण्याबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी आपत्कालीन केंद्र स्थापण्यात आली पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच अतिवृष्टी आणि पूरक परिस्थिती संदर्भात त्यांनी अन्य माहिती देऊन सूचना केल्या.
सभेला जिल्हा पोलीस प्रमुख डॉ संजीव पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपविभाग अधिकारी बलराम चव्हाण, बैलहोंगलच्या विभागाधिकारी प्रभावती यांच्यासह विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि पीडिओ सभेला उपस्थित होते.