बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील शेतकरी संपर्क केंद्रांसह एकूण १७० केंद्रांवर २५ मे पासून पेरणी बियाणांचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी, कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना केल्या. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पेरणी बियाणांच्या पुरेशा वितरणासाठी योग्य ती व्यवस्था करावी, याशिवाय खते, कीटकनाशके वाटपाची सोय करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
याचप्रमाणे पीक नुकसानीचे तपशील भरण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक “निवारण पोर्टल” उघडणार असून यामुळे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कार्यवाही करावी, २४ तासांच्या आत लोकांची व पशुधनाची जीवितहानी झाल्यास नियमानुसार नुकसान भरपाई देण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पावसाळा सुरू होत असल्याने जिल्ह्यातील जीर्ण शाळा खोल्यांची पाहणी करावी. जीर्ण इमारती असल्यास त्या दुरुस्त करण्यात याव्यात किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
बेळगाव शहरातील पावसाळ्यात महत्त्वाचे रस्ते कचरामुक्त करून स्वच्छ करावेत जेणेकरून पाणी सुरळीतपणे वाहून जाईल. जीर्ण झालेले पूल व रस्ते दुरुस्त करावेत. कोणत्याही प्रकारची आपत्ती टाळण्यासाठी पावले उचलावीत, धोक्याची पातळी गाठणाऱ्या तलावांवर लक्ष ठेवावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपविभागीय अधिकारी बाळाराम चव्हाण, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रभावती, महानगरपालिका आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी यांच्यासह कृषी, फलोत्पादन, पाटबंधारे, अन्न, आरोग्य, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.