येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांसह प्रामुख्याने चलवादी व मादीग समाजाने निवडणुकीतील उमेदवार रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी आणि महेश तमन्नावर यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याची माहिती दलित संघटनेगळ वक्कुट बेळगाव जिल्हाध्यक्ष डाॅ. महालिंगप्पा कोलकार यांनी दिली.
शहरात आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांनी तसेच खास करून चलवादी व मादीग समाजाने येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दलित नेते गोकाक मतदार संघातील उमेदवार रमेश जारकीहोळी, यमकनमर्डी (एसटी) मतदार संघातील उमेदवार सतीश जारकीहोळी, अरभावी मतदार संघातील उमेदवार भालचंद्र जारकीहोळी आणि कुडची (एससी) मतदार संघातील महेश तमन्नावर यांना आपला संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक रिंगणातील हे नेते आगामी दिवसात निवडून आल्यानंतर आमच्या समस्यांची दखल घेऊन आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करतील ही अपेक्षा आहे. कारण यापूर्वी त्यांनी अनेक कार्यक्रम आणि योजनांचा आम्हाला लाभ मिळवून दिला आहे. यासाठी जिल्ह्यातील दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक या सर्वांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, असे डॉ. कोलकार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील फक्त चार उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ आम्ही काँग्रेस, भाजप, निधर्मी जनता दल आदी राजकीय पक्षांचा विरोधात आहोत असे नाही. आमचा त्यांनाही पाठिंबा आहे मात्र सर्वाधिक पाठिंबा आम्ही जारकीहोळी कुटुंबाला देत आहोत.
कारण त्यांनी आतापर्यंत फक्त दलित समाज नव्हे तर इतर सर्व समाजाच्या हितावह काम केले आहे त्यांना प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे भविष्यात जारकीहोळींना आणखी मोठे अधिकार मिळावेत, यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत असेही डॉ. महालिंगप्पा कोलकार यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस दलित संघटनेगळ वक्कुटचे पदाधिकारी आणि दलित संघटनांचे नेते उपस्थित होते.