बेळगाव लाईव्ह : शनिवार डी. १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी फेरीनिहाय करण्यात येणार असून बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाचा निकाल मतमोजणीच्या फेऱ्यातून जाहीर होणार आहे. शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालासाठी प्रशासन आणि निवडणूक आयोगाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.
शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून १८ मतदार संघापैकी निपाणी मतदार संघासाठी २३ फेऱ्यातून मतमोजणी होणार आहे. याचप्रमाणे चिकोडी-सदलगा मतदार संघासाठी २३, अथणी मतदार संघासाठी २४, कागवाड मतदार संघासाठी २१, कुडची मतदार संघासाठी २०, रायबाग मतदार संघासाठी २१, हुक्केरी मतदार संघासाठी २१, अरभावी मतदार संघासाठी २६, गोकाक मतदार संघासाठी २७, यमकनमर्डी मतदार संघासाठी २२, बेळगाव उत्तर मतदार संघासाठी २३, बेळगाव दक्षिण मतदार संघासाठी २३, बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी २७, खानापूर मतदार संघासाठी २४, कित्तूर मतदार संघासाठी २१, बैलहोंगल मतदार संघासाठी २१, यल्लम्मा सौंदत्ती मतदार संघासाठी २२ तर रामदुर्ग मतदार संघासाठी २३ फेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी पार पडणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणी प्रक्रियेत फेरीनिहाय आकडेवारी उपलब्ध करून देण्यात येणार असून उद्या दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘अशी’ आहे स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची व्यवस्था
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या २२४ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी उघडणार असून १० मे रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेसह बेळगावमधील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात ठेवण्यात आली आहेत. शनिवार दि. १३ मे रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून दुपारीपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांच्या मतमोजणीसाठी ६ विभागात मतमोजणीची विभागवार व्यवस्था करण्यात आली आहे. आर.पी.डी. महाविद्यालयातील नव्या इमारतीत तळमजल्यावर रायबाग मतदार संघाची मतमोजणी पार पडणार आहे. तर याच इमारतीत पहिल्या मजल्यावर एका बाजूला यमकनमर्डी मतदार संघ आणि दुसऱ्या बाजूला बैलहोंगल मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. परुळेकर बिल्डिंगच्या तळमजल्यावर कागवाड, पहिल्या मजल्यावर हुक्केरी आणि दुसऱ्या मजल्यावर खानापूर मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. लॅबोरेटरी बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावर एका बाजूस निपाणी तर दुसऱ्या बाजूस रामदुर्ग मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर तीन विभागात अथणी, बेळगाव दक्षिण आणि सौंदत्ती यल्लम्मा या तीन मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. वाचनालयाच्या इमारतीत गोकाक मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. तर घोटगे इमारतीत तळमजल्यावर कुडची, पहिल्या मजल्यावर कित्तूर, दुसऱ्या मजल्यावर बेळगाव उत्तर मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. बीबीए विभागाच्या इमारतीत तळमजल्यावर चिकोडी-सदलगा, पहिल्या मजल्यावर बेळगाव ग्रामीण आणि दुसऱ्या मजल्यावर अरभावी मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आरपीडी महाविद्यालयात मतमोजणी यंत्र ठेवण्यात आले असून विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून https://results.eci.gov.in/ या संकेतस्थळावर लाईव्ह निकाल पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.