बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी पार पडली असून शनिवार दि. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
उद्या सकाळी ८ पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यात 13.05.2023 रोजी सकाळी 06.00 ते 14.05.2023 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत सर्व मद्य उत्पादन युनिट्स/वाहतूक/ स्टोरेज/विक्री आउटलेट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.
या आदेशातील सूचनांचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135 सी (2) आणि (3) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
बेळगाव तसेच चिकोडी उत्पादन शुल्क उपायुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक आणि उप उत्पादन शुल्क यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.