बेळगाव लाईव्ह : महानगर पालिकेकडून देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यासाठी, तसेच अन्य माहितीसाठी आता लेखी अर्ज सक्तीचा करण्यात आला असून यापुढे दाखले किंवा अन्य कोणत्याही माहितीसाठी विहित नमुन्यात अर्ज न देता कोऱ्या कागदावर आयुक्त किंवा आरोग्याधिकाऱ्यांच्या नावे अर्ज देण्यात यावा, असे आवाहन पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केले आहे.
यापूर्वी जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी महापालिकेकडून विहित नमुन्यातील अर्ज तयार केले होते. तो अर्ज भरून दिल्यावर महापालिकेकडून आधी मंजूर किंवा नामंजूर केला जात होता. त्यानंतर दाखल्यांचे वितरण केले जात होते. पण, तो अर्ज कालबाह्य झाल्याचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ त्यांचे म्हणणे आहे.
यामुळे आता जन्म- मृत्यू दाखले किंवा संबंधित अन्य माहितीसाठी महापालिकेकडे कोऱ्या कागदावर अर्ज दाखल करावा लागणार आहे.
जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी महापालिकेने खूप वर्षांपूर्वी विहित नमुन्यातील कन्नड व इंग्रजी अशा दोन भाषेत वेगवेगळा अर्ज तयार केला होता. दाखले मागण्यासाठी गेलेल्यांना तो अर्ज दिला जात होता. त्यात अर्जदाराचे नाव, ज्याचा जन्म किंवा मृत्यू झाला असेल त्याचे नाव, स्त्री किंवा पुरूष, जन्म किंवा मृत्यू तारीख, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्म किंवा मृत्यू स्थळ, पत्ता, दाखल्याच्या किती प्रती हव्यात तो आकडा, दाखला हवा असेल त्याचे अर्जदाराशी असलेले नाते, कायम स्वरूपी पत्ता ही माहिती त्यात नमूद केली जात होती. मात्र आता कोणताही दाखला हवा असेल किंवा माहिती हवी असेल तर संबंधित व्यक्तीने स्वतःच थेट अर्ज दाखल करावा, असे कळविण्यात आले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली असल्याने जन्म मृत्यू दाखले विभागाने विहीत नमुन्यातील अर्ज स्विकारणे बंद केले असून कोऱ्या कागदावर अर्ज लिहून देण्याची सक्ती केली जात आहे. आधीच्या अर्जात नावात दुरुस्ती करणे,
महापालिकेकडे दाखले उपलब्ध नसल्याबाबतच्या पत्राची मागणी करणे याची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची. शिवाय पालिकेच्या विहित नमुन्यातील अर्जाचा गैरपावर देखील होत असल्याचे निदर्शनात आले. पालिका परिसरातील एजंटांकडेही हे अर्ज उपलब्ध होत होते. त्यामुळे सदर अर्जच रद्द करण्याचा निर्णय आरोग्याधिकारी डॉ. डूमगोळ यांनी घेतला आहे.