बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांबाबत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य संचारले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या चारही उमेदवारांना मराठी भाषिक कार्यकर्त्यांना तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज खानापूर मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांनी जल्लोषी प्रचार केला.
अंतिम टप्प्यात असलेल्या प्रचारादरम्यान खानापूरमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
ना पैसे, ना जेवण, ना कोणत्याही प्रकारचे आमिष अशा परिस्थितीत पदरमोड करून समितीच्या पाठीशी खंबीरपणे आबालवृद्धांनी ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असेच चित्र सीमाभागात दिसून येत आहे. आज खानापूर भागात मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत ढोलताशा, भगवे ध्वज, भगव्या टोप्या-शाली, महाराष्ट्र गीताचा जयजयकार, खानापूरवासियांचा अपूर्व उत्साह, प्रचार फेरीतील मराठी भाषिकांचा अबालवृद्धांसह सहभाग, जोरदार घोषणाबाजी या साऱ्या वातावरणात चोहोबाजूंनी महाराष्ट्र एकीकरण समितीचाच जयजयकार झालेला पाहायला मिळाला.
खानापूर मतदार संघ हा समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या निवडणुकीत पुन्हा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी मराठी मनगटात ताकद एकवटली असून मुरलीधर पाटील यांना मिळत असलेला पाठिंबा पाहिल्यास या निवडणुकीत गुलाल महाराष्ट्र एकीकरण समितीचाच उधळला जाईल, असा ठाम विश्वास प्रत्येक मराठी भाशिकांतून व्यक्त होत आहे.